"फेमिनिझम हा फालतू मुद्दा" नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, 'पुरुष गरोदर राहतील तेव्हाच...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:53 PM2023-11-26T14:53:02+5:302023-11-26T14:54:09+5:30
'फेमिनिझम, स्त्री पुरुष समानता यावर चर्चा करणं किंवा यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही.'
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात कायम यशस्वी होतात. याही वयात त्या हटके भूमिका साकारत सर्वांनाच सरप्राईज करत आहेत. नुकतंच नीना गुप्तांनी फेमिनिझम या मुद्द्यावर परखड मत मांडलं. फेमिनिझम हा मूळातच फालतू विषय असून जोवर पुरुष गरोदर राहू शकत नाहीत तोवर स्त्री पुरुष समानता म्हणता येणार नाही असं त्या यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
एका पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, 'फेमिनिझम, स्त्री पुरुष समानता यावर चर्चा करणं किंवा यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही. मला वाटतं स्त्रियांनी आर्थिक दृष्टीने स्वतंत्र राहिलं पाहिजे. आपल्या कामावर लक्ष द्या. जर तुम्ही गृहिणी आहात तर स्वत:ला छोटं नका समजू. स्त्री पुरुष समान होऊच शकत नाही. जोवर पुरुष गरोदर होत नाहीत दोघांमधलं अंतर कायम राहणार.'
याचा अर्थ स्त्रियांना पुरुषांची गरज नसते का? असं विचारलं असता नीना म्हणाल्या,'गरज असते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझंच एक उदाहरण आहे. माझी एक दिवस पहाटे ४ वाजताची फ्लाईट होती. तेव्हा मला कोणी बॉयफ्रेंड नव्हता. खारमधून मी निघाले ४ वाजता तेव्हा अंधार होता. एक माणूस माझा पाठलाग करायला लागला. तेव्हा मी घाबरुन घरी गेले. दुसऱ्या दिवशी मी तीच फ्लाईट बुक केली पण मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिले आणि त्याने मला विमानतळावर सोडलं. म्हणूनच स्त्रियांना पुरुषांची गरज आहेच.'
नीना गुप्तांनी केलेल्या अशा अनेक विधानांवर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नुकताच त्यांचा 'लस्ट स्टोरीज 2' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये त्यांनी अगदीच मॉडर्न विचार असलेल्या आजीची भूमिका साकारली होती.