KWK 8: 'मला पार्टीलाही जायची परवानगी नव्हती'; नीतू कपूरवर ऋषी कपूर यांनी लादली होती बंधन?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 12:04 PM2024-01-11T12:04:52+5:302024-01-11T12:07:50+5:30
' ऋषी एक कठोर शिस्तीचा बॉयफ्रेंड होता', असंही त्या या शोमध्ये म्हणाल्या.
करण जोहरच्या (karan johar) 'कॉफी विद करण' या लोकप्रिय चॅट शोचा सध्या 8 वा सिझन चालू आहे. या नव्या सिझनमध्ये आतापर्यंत अनेक लोकप्रिय, दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यामध्येच आता या शोमध्ये बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (zenat aman) आणि नीतू कपूर (nitu kapoor) या हजेरी लावणार आहे. सध्या या शोचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नीतू कपूर यांनी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये झीनत अमान आणि नीतू कपूर यांनी त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन्ही आयुष्यावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलत असताना नीतू कपूर यांनी ऋषी कपूर त्यांच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह होते असं सांगितलं. इतकंच नाही तर ते नीतू यांना बॉलिवूड पार्ट्यांमध्येही जाऊ देत नव्हते, असाही खुलासा त्यांनी केला.
काय म्हणाल्या नीतू कपूर?
"ज्यावेळी मी आणि ऋषी एकमेकांना डेट करत होतो त्यावेळी ते फार कडक शिस्तीचे प्रियकर होते. ते मला साधं पार्टीला जायचीही परवानगीही द्यायचे नाहीत. मी यश चोप्रा यांच्यासोबत शूटिंग करत होते. त्यावेळी रात्री उशीरा पार्ट्या व्हायच्या. पण, मी कधीच कोणत्या पार्टीमध्ये गेले नाही. कारण, ऋषी कायम म्हणायचा, हे करु नकोस, ते करु नकोस. घरी जा असं सांगायचे आणि, कायम पार्टीला जाण्यास विरोध करायचे", असं नीतू कपूर म्हणाल्या.
पुढे त्या सांगतात, "सिनेमाच्या पार्ट्यांसाठी जाणं माझं गरजेचं होतं. तरी सुद्धा मी या पार्ट्यांपासून दूर राहिले. माझ्या आयुष्यात दोन कडक शिस्तीची माणसं होती. एक तर माझी आई आणि दुसरा माझा बॉयफ्रेंड. या दोघांच्या कात्रीत मी सापडले होते."
दरम्यान, नीतू कपूर यांनी १३ एप्रिल १९७९ मध्ये ऋषी कपूर यांच्याशी साखरपुडा केला. त्यानंतर २२ जानेवारी १९८० मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. परंतु, ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर नीतू कपूर यांनी इंडस्ट्रीला रामराम केला. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर नीतू यांनी अलिकडेच पुन्हा एकदा त्यांच्या फिल्मी करिअरला नव्याने सुरुवात केली आहे.