नीतू कपूर यांना ऑफर झाला होता अमिताभ बच्चन यांचा ‘सिलसिला’, म्हणून दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 04:01 PM2021-06-27T16:01:59+5:302021-06-27T16:03:48+5:30
होय, ‘सिलसिला’ चित्रपटासाठी नीतू कपूरला (Neetu Kapoor) विचारणा झाली होती. पण कदाचित तिच्या नशिबी हा सिनेमा नव्हताच.
‘सिलसिला’ (Silsila) हा गाजलेला सिनेमा. अमिताभ आणि रेखाचे प्रेम फुलत असतानाच अमिताभचा वैमानिक भाऊ शशी कपूरचे अपघाती निधन होते आणि अमिताभला भावाच्या पत्नीशी म्हणजे जयाशी लग्न करावे लागते. तर रेखाचे लग्न संजीव कुमारसोबत होते. पण होळीच्या निमित्ताने अमिताभ-रेखा यांचे प्रेम पुन्हा जागे होते..., असे कथानक असलेला 1981 साली प्रदर्शित झालेल ‘सिलसिला’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटासाठी नीतू कपूरला (Neetu Kapoor) विचारणा झाली होती. पण कदाचित तिच्या नशिबी हा सिनेमा नव्हताच.
होय, नीतू खुद्द ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या (Super Dancer Chapter 4) सेटवर हा खुलासा केला.
हा सिनेमा नाकारण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले. नीतू कपूर यांनी सांगितले, ‘यश चोप्रांनी मला सिलसिला या चित्रपटासाठी विचारले होते. पण मी त्यांना नकार दिला होता. कारण होते माझे लग्न. यश चोप्रा यांनी मला या चित्रपटाबद्दल विचारले त्याचदरम्यान मी ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न करणार होते. यशजी, मी हा सिनेमा करू शकणार नाही. माझे लग्न होतेय, असे मी त्यांना म्हणाले होते. अगदी मी माझी एंन्गेजमेंट रिंगही त्यांना दाखवली होती. यानंतरही यशजींनी माझे अनेक प्रकारे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण मी नकार दिला.’
यशजी ‘सिलसिला’मध्ये अमिताभ यांच्या अपोझिट मला किंवा परवीन बाबीला घेऊ इच्छित होते. पण ते शक्य झाले नाही. मग अमिताभ यांना सोडून चित्रपटाची अख्खी कास्ट बदलली गेली, असेही नीतू यांनी सांगितले.
असे म्हणतात की, ‘सिलसिला’ पद्मिनी कोल्हापुरे हिलाही ऑफर झाला होता. पण तिनेही या सिनेमाला नकार दिला होता.
स्मिता साकारणार होती जयाची भूमिका...
‘सिलसिला’च्या कास्टबद्दल खुद्द यश चोप्रा एका मुलाखतीत बोलले होते. या चित्रपटात स्मिता पाटीलला जया बच्चनचा रोल तर परवीन
बाबीला रेखाचा रोल देण्यात आला होता. ही स्टारकास्ट फायनल झाल्यावर यश चोप्रा अमिताभ यांच्याकडे गेलेत. तुम्ही स्टारकास्टबद्दल समाधानी आहात का? असा प्रश्न अमिताभ यांनी यशजींना केला. यावर नाही, मला यात जया व रेखा यांना घ्यायची इच्छा आहे, असे ते यावर म्हणाले. अमिताभ यांना हरकत नव्हती. पण जया व रेखा यांचा होकार मिळवणार कोण? असा प्रश्न होता. तुम्ही दोघींना राजी करू शकलात तर मी तयार आहे, असे अमिताभ यशजींना म्हणाले आणि इथुन पुढे अमिताभ वगळता सिनेमाचा अख्खा अंदाजच बदलला..