त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही...! ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:15 PM2021-04-30T12:15:27+5:302021-04-30T12:15:46+5:30
Rishi Kapoor Death Anniversary: बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले.
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. आज त्यांच्या निधनाला एक वर्ष झाले. (Rishi Kapoor Death Anniversary)ऋषी कपूर गेलेत, पण त्यांचा तो हसरा चेहरा लोकांच्या मनात आजही जिवंत आहेत.
आज त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पत्नी व अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या पोस्टसोबत त्यांनी ऋषी यांच्यासोबतचा एक अनसीन फोटोही शेअर केला आहे. या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोत ऋषी व नीतू दिसत आहेत.
या फोटोसोबत त्यांनी लिहिले, ‘गेले वर्ष संपूर्ण जगासाठी दु:खद आणि निराशाजनक राहिले. आमच्यासाठी आणखीच जास्त. कारण गेल्या वर्षी आम्ही त्यांना कायमचे गमावले. गेल्या वर्षभरात त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही. कारण ते आमच्या अस्तित्वाचा भाग होते. कधी त्यांचा समंजस सल्ला, कधी त्यांच्या गोष्टी... ओठांवर हास्य आणत आम्ही त्यांच्या आठवणींसह त्यांना सेलिब्रेट केले. कारण ते कायम आमच्या हृदयात आहेत. त्यांच्याशिवाय आयुष्य कधीच पूर्वीसारखे नसेल. पण आयुष्य चालत राहिल...,’ अशी भावूक पोस्ट नीतू यांनी लिहिली आहे.
ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिनेही पापासाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे. तिने दोन फोटोंचा एक कोलाज शेअर केला. ‘ मी पुन्हा एकदा तुम्हाला मुश्क म्हणताना ऐकू शकले असते तर... आम्ही सतत तुमच्याबद्दल विचार करतो, तुमच्याबद्दल बोलतो. तुम्हाला विसरलेलो नाहीत, कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही आमच्या हृदयाजवळ आहात. आपली पुन्हा भेट होत नाही,तोपर्यंत तुम्ही आमच्या आयुष्याचे मार्गदर्शक म्हणूनच आमच्यासोबत असाल... लव्ह यू आॅलवेल,’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.