शेवटच्या क्षणापर्यंत पाठिशी उभे राहिलेल्या लोकांचे नीतू कपूर यांनी मानले आभार, वाचा त्यांची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:07 PM2020-05-04T12:07:32+5:302020-05-04T12:09:04+5:30
ऋषी कपूर यांच्या शेवटच्या काळात त्यांना साथ दिलेल्या लोकांचे नीतू कपूर यांनी आभार मानले आहेत.
बुधवारी रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूरला यांना शेवटपर्यंत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर यांनी साथ दिली. ते कॅन्सरवर परदेशात उपचार घेत असताना देखील त्या सतत त्यांच्यासोबत होत्या. नीतू यांनी ऋषी यांच्या निधनाननंतर पाच दिवसांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तुमच्या जाण्याने आम्ही खूप काही गमावले आहे असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. नीतू यांनी ऋषी कपूर यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, तुमच्या जाण्याने आपल्या कुटुंबियांने खूप काही गमावले आहे. आम्ही जेव्हा गेल्या काही महिन्यांचा विचार करत होतो त्यावेळी एचएन रिलायन्स रुग्णालयाचे आभार मानावे हा विचार सगळ्यात पहिल्यांदा मनात आला. या रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स, वॉडबॉय सगळ्यांचे आभार मानणे गरजेचे आहे. डॉ. तरंग गायचंदानी यांनी त्यांच्याच घरातील एक सदस्य असल्याप्रकारे ऋषी यांच्यावर उपचार केले. तसेच आमच्या कुटुंबियाचा एक भाग असल्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक गोष्टीत सल्ला दिला. या सगळ्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते.
1975 मध्ये नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा केला आणि एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लोकप्रिय जोडीने 11 सिनेमांत एकत्र काम केले. खऱ्या आयुष्यात पती-पत्नी म्हणून वावरताना नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी यांना सोबत केली.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. नीतू अगदी 14 वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूर यांना डेट करण्यास सुरुवात केली. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतू यांना सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतू यांना इरिटेट करत असे. मात्र हळूहळू हाच राग प्रेमात रुपांतरित झाला. ‘खेल खेल में’ सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली. अफेअरच्या काहीच वर्षांनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.