'जग घुमिया' सिंगर नेहा भसीनला या कामासाठी कधीच करावा लागला नाही स्ट्रगल?जाणून घ्या काय आहे ती गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 09:19 AM2017-06-27T09:19:27+5:302017-06-27T15:01:37+5:30
आपल्या सूरांनी तिनं रसिकांना अक्षरक्षा वेड लावले आहे. आता पुन्हा एकदा नेहा भसीनची चर्चा सुरु आहे. नुकतंच नेहाने आपले चन माही हे गाणं रिलीज केले आहे.
तुला कोणत्या प्रकारची गाणी गाण्यास आवडतात ?गाण्यांचा स्वीकार करताना कोणत्या गोष्टींचा तू विचार करते ?
कोणत्याही सिनेमातील गाणं त्या सिनेमाचा जणू आत्मा असतो. गाण्यांमुळे सिनेमा रसिकांपर्यंत पोहचतो. माझ्या सिनेमातील गाणीच त्या सिनेमाचं प्रमोशन करत असतात. मी एक गायक आहे.प्रत्येक प्रकारची गाणी गायला मला आवडतात. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याची माझी इच्छा आहे.त्यामुळे मला येणा-या गाण्याच्या ऑफर्स नाकारण्याचा प्रश्नच नाही. ऑफर्स आल्या की मी त्या स्वीकारते. कारण गाणे गाणं माझं काम आहे. ज्या गाण्यांशी मी कनेक्ट होते ती गाणी गायला मला आवडतात.
आज तू लोकप्रिय आहेस, रसिकांचं प्रेम तुला मिळतंय. मात्र तुलाही स्ट्रगल करावा लागला का ?
स्ट्रगल हा प्रत्येकाला करावाच लागतो. माझ्या मते प्रत्येकाचा आयुष्यभर स्ट्रगल सुरुच असतो. स्ट्रगल शेवटी जगण्याचा एक संघर्ष असतो.जगण्यासाठी दोन वेळचे खाणं मिळावं हेच खूप झालं. त्याबाबतीत मी स्वतःला नशीबवान मानते की मला आयुष्यात किमान खाण्या-पिण्यासाठी जास्त स्ट्रगल करावा लागला नाही.
असं ब-याचदा होत असेल की जेव्हा तुला आत्मविश्वास ढळल्यासारखं वाटतं त्यावेळी स्वतःला कशी उभारी देते ?
एका मुलीसाठी या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मात्र मला माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. हाच विश्वास मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कायम मदत करतो. कधीही मला आत्मविश्वास ढळतो असं वाटतं त्यावेळी मी मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते. त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे पाहून आपुसकच प्रेरणा मिळते. काही दिवसांपूर्वी ऍसिड हल्ला पीडित तरुणीचं लग्न झालं. अशांना पाहिल्यानंतर जगण्याची नवी उमेद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
टॅलेंट आणि आवड या गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी कितपत गरजेच्या असतात ?
जीवनात कुणालाही कोणतीच गोष्ट सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत नाहीत. कुणालाही जे यश मिळतं त्यामागे मोठी मेहनत असते. कारण एखाद्याकडे टॅलेंट असण्यासोबत त्या गोष्टीविषयीची आवड असणेही गरजेचे आहे. मी सुद्धा रियालिटी शोमधून पुढे आली आहे. त्यामुळे मला या गोष्टींची जाण आहे. लवकरच शब्द सिनेमा येत असून त्यात माझे गाणे आहे. या सिनेमात रवीना टंडनची भूमिका आहे.