'गणपत'मधील नवीन गाणं रिलीज, बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला टायगर श्रॉफ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 05:13 PM2023-10-13T17:13:21+5:302023-10-13T17:13:36+5:30
Ganpat Movie : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान आता नुकतेच गणपतमधील नवीन गाणं रिलीज झाले आहे.
गणपत चित्रपटातील 'हम आये हैं' या पहिल्या गाण्यानंतर आता निर्मात्यांनी नुकतेच 'गणपत'चे दुसरे गाणे 'जय गणेशा' रिलीज केले आहे, ज्यामध्ये टायगर श्रॉफ 'गणपती बाप्पा'च्या भक्तीत तल्लीन झाला आहे. यापूर्वी न पाहिलेला असा टायगर पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण टायगर श्रॉफला अनेक गाण्यांवर थिरकताना पाहिले आहे. पण यावेळी चाहत्यांना 'गणपत' चित्रपटातील 'जय गणेश' या नव्या गाण्यात अॅक्शन स्टार टायगर श्रॉफची पूर्णपणे न पाहिलेली स्टाईल पाहायला मिळणार आहे. २ मिनिटे ३३ सेकंदाचे हे गाणे ऐकल्यानंतर तुम्हीही गणेशाच्या भक्तीत तल्लीन व्हाल. टायगर श्रॉफच्या डॅशिंग एन्ट्रीने गाण्याची सुरुवात होते, ज्यामध्ये त्याने हातावर गणपती बाप्पाचे छोटे ब्रेसलेट घातले आहे.
गाण्याची सुरुवात 'वक्रतुंड महाकाय' या श्लोकाने होते, त्यानंतर टायगर 'जय गणेश'वर आपल्या नेत्रदीपक स्टेप्सने मने जिंकताना दिसतो. 'गणपत'च्या या नवीन गाण्याचे बोल खूपच सुंदर आहेत. 'गणपत'चे हे गाणे पुढच्या वर्षीच्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्वाधिक वाजवले जाऊ शकते. तसेच ‘जय गणेशा’ हे गाणे विशाल मिश्रा यांनी गायन व संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल हे अक्षय त्रिपाठी यांनी लिहिले आहेत. या गाण्यातील टायगर श्रॉफच्या डान्स, मुव्ह्ज खुपच दमदार आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सॅनन आणि अमिताभ बच्चन हे दोन कलाकार दिसतील. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांत २० ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.