‘निकाह’ मुळे रातोरात प्रसिद्ध झाली होती अभिनेत्री सलमा आगा, असे राहिले अभिनेत्रीचे खासगी आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 05:55 PM2021-12-24T17:55:12+5:302021-12-24T17:55:22+5:30
१९९६ साली 'गहरा राज' सिनेमानंतर बॉलीवुडला अलविदा केलं. त्यामुळं रिअल लाईफमध्ये सलमा आगा(Salma Agha) यांच्यावर दिल के अरमां आसुओं में बह गए...' म्हणायची वेळ आली.
'दिल के अरमां आसुओं में बह गए...' म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी गायिका आणि बॉलीवुडची अभिनेत्री म्हणजे सलमा आगा (Salma Agha). आपला अभिनय, सौंदर्य, दिलखेचक अदा यासोबतच सुरेल अंदाज यामुळे सलमा आगा यांनी बॉलीवुडमध्ये ८०-९० चे दशक गाजवलं. मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या सलमा आगा यांचा जन्म लंडनमध्ये झाला. लंडनमध्येच त्यांचं बालपण गेलं. कोणत्याही तरुणीला रुपेरी पडद्याची भुरळ पडावी तशी ती सलमा आगा यांनाही पडली आणि त्या बॉलीवुडकडे आकर्षित झाल्या. बी.आर. चोप्रा यांच्या निकाह सिनेमातून सलमा आगा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
सलमा आगा यांच्याकडे घायाळ करणारं सौंदर्य, अभिनय कौशल्यासह मधुर सूरांची दैवी देणगी होती. त्यामुळेच पहिल्यावहिल्या सिनेमात त्यांना अभिनयासह पार्श्वगायनाची संधी लाभली. या सिनेमातील 'दिल के अरमां आसुओं में बह गए...' या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पहिल्याच सिनेमानं त्यांना रातोरात स्टार बनवलं. मात्र हे स्टारपण तिला जपता येत नाही.
हीच बाब सलमा आगा यांच्या बाबतीतही घडलीय. त्यांनी अनेक सिनेमा केले. मात्र रसिकांनी या सिनेमांना नाकारलं. चुकीच्या सिनेमांची निवड त्याला कारणीभूत ठरल्याचा दावा त्यावेळी सलमा आगा यांनी केला. सिनेमापेक्षा त्यांच्या रिअल लाईफ रोमान्सच्याच चर्चा जास्त हिट ठरल्या. त्यांचं खासगी जीवनातही बरीच उलथापालथ झाली.
वयाच्या 16 व्या वर्षी लग्न करणा-या या अभिनेत्रीचा तीन वेळा घटस्फोट झाला. करियरमधील उलथापालथ आणि वाद यामुळं त्यांनी १९९६ साली गहरा राज सिनेमानंतर बॉलीवुडला अलविदा केलं. त्यामुळं रिअल लाईफमध्ये सलमा आगा यांच्यावर दिल के अरमां आसुओं में बह गए...' म्हणायची वेळ आली.