Nikamma Movie Review: शिल्पा शेट्टीचा ‘निकम्मा’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:30 PM2022-06-17T16:30:12+5:302022-06-17T16:31:47+5:30
Nikamma Movie Review in marathi: दिग्दर्शक सब्बीर खान यांनी बनवलेला हा चित्रपट ‘मिडलक्लास अभय’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शिल्पा शेट्टीच्या जोडीला अभिमन्यू दासानीची धडाकेबाज शैली या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे.
संजय घावरे
........................
दर्जा : **1/2
कलाकार : अभिमन्यू दासानी, शिल्पा शेट्टी, शर्ली सेठिया, समीर सोनी, अभिमन्यू सिंग, सचिन खेडेकर
दिग्दर्शक : सब्बीर खान
निर्माते : सोनी पिक्चर्स इंटरनॅशन प्रॉडक्शन्स, सब्बीर खान
शैली : अॅक्शन-कॉमेडी
कालावधी : २ तास २८ मिनिटे
...........................
Nikamma Movie Review: पूर्वीच्या काळातील काही सिनेमांनी भावजय आणि दीर यांचं सात्विक नातं सादर करत कौतुकाची थाप मिळवली आहे. दीराला मुलासमान मानणारी जुन्या चित्रपटांमध्ये पाहिलेली वहिनी या चित्रपटातही आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दीर आणि भावजय यांच्यातील पवित्र नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. नवोदितांच्या जोडीला मातब्बर कलाकारांना घेऊन दिग्दर्शक सब्बीर खान यांनी बनवलेला हा चित्रपट म्हणजे ‘मिडलक्लास अभय’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शिल्पा शेट्टीच्या जोडीला अभिमन्यू दासानीची धडाकेबाज शैली या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे.
कथानक : चित्रपटाची कथा काहीही काम न करणाऱ्या आदी नावाच्या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. थोरल्या भावासोबत राहणाऱ्या आदीच्या जीवनात अवनी वहिनीच्या रूपात जणू वादळ येतं. आपली वहिनी खूप खडूस असून, तिच्यामुळं भाऊ आपल्यापासून दूर जात असल्याचं त्याला वाटतं. आरटीओ ऑफिसर असलेल्या अवनीची बदली होते आणि थोरला भाऊ आदीला वहिनीसोबत जाण्याचा आदेश देतो. आदीनं काहीतरी काम करावं यासाठी अवनी खूप प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. अशातच राजकारणात उतरण्यासाठी सज्ज असणाऱ्या विक्रमजीत नावाच्या गुंडाच्या अनधिकृत टॅक्सी व्यवसायावर अवनी निशाणा साधते. त्यानंतर कथानक एक वेगळंच वळण घेतं आणि अनपेक्षित क्लायमॅक्स पहायला मिळतो.
लेखन-दिग्दर्शन : दीर आणि भावजय यांच्यातील निर्मळ नात्याचा धागा पकडून कायद्याचा खेळखंडोबा करणाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न चांगला असला तरी दोघांमधील संघर्ष विशेष प्रभावी वाटत नाही. रिमेक करताना हिंदी भाषिक प्रेक्षकांची आवड लक्षात घेणं गरजेचं होतं.
तेलुगू भाषेतील काही मसालेपटांनी हिंदीत बाजी मारली असल्यानं सर्वच चित्रपट हिट होतील असं मुळीच नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला वहिनीची ओळख जणू कैकयीसारखी करून देण्यात आली आहे. प्रेमकथेच्या ट्रॅकमध्ये पहिल्याच दृश्यात नायिका निकी गुलाब देऊन लग्नाची मागणी काय घालते, अचानक निकीला होस्टेल सोडून तिचे वडील अवनीच्या म्हणजेच तिच्या बहिणीच्या घरी काय आणतात, आदी-निकीच्या नात्याबद्दल समजल्यावर अवनी तिला पुन्हा होस्टेलमध्ये पाठवण्याऐवजी घरी काय पाठवते या गोष्टी तर्कहीन वाटतात. कंटीन्यूटीमधील काही दृश्यांमध्ये कपडे बदलल्याचंही दिग्दर्शकाच्या लक्षात आलेलं नाही. इतकंच काय अगोदरच्या दृश्यात जी बाईक जळलेली दाखवली ती पुन्हा थोड्या वेळानं परत दिसते. बलाढ्य खलनायकासमोर नायक बच्चा वाटत असला तरी खलनायक केवळ तोंडाची वाफ घालवतो याचं आश्चर्य वाटतं. नायकाला लार्जर दॅन लाईफ बनवण्याच्या नादात खलनायकाला दाबून टाकण्यात आल्याचं जाणवतं. नायक मिडलक्लास असल्याचं केवळ बोलतो, पण त्याचं राहणीमान आणि आलिशान घर पाहता तसं मुळीच वाटत नाही. ऑफिसर असलेली अवनी दीराला शिकवण्यासाठी जमिन विकते हे देखील पटत नाही. अॅक्शन, संकलन, लोकेशन्स चांगली आहेत. ‘निकम्मा किया इस दिल ने...’ या गाण्याची जादू पुन्हा अनुभवता येते.
अभिनय : ‘मर्द को दर्द नहीं होता’नंतर पुन्हा एकदा अभिमन्यू दासानीनं अभिनयासोबतच डान्स आणि अॅक्शन दृश्ये चांगली केली आहेत, पण शब्दोच्चारांमध्ये छोटासा एरर असल्यानं तो जेव्हा बोलू लागतो, तेव्हा ते कायम खटकत रहातं. शिल्पा शेट्टी भाव खाऊन गेली आहे. शिल्पाचं एक वेगळंच रूप यात दिसतं. सुरुवातीपासून शांत दिसणाऱ्या शिल्पाची अॅक्शनही शेवटी पहायला मिळते. शर्ली सेठियानं बिनडोक नायिकेची भूमिका साकारत अभिमन्यूला ठिकठाक साथ दिली आहे. अभिमन्यू सिंग एक चांगला अभिनेता असला तरी यात त्याला फार वाव मिळालेला नसल्याचं जाणवतं. समीर सोनी आणि सचिन खेडेकर यांनी लहानशा भूमिकाही चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.
सकारात्मक बाजू : शिल्पाची बदललेली शैली आणि अभिमन्यूनं केलेला चांगला प्रयत्न. मायेचं नातं आणि कर्तव्य हे दोन भिन्न पैलू एकाच चित्रपटात मांडण्यात आले आहेत.
नकारात्मक बाजू : पटकथेची मांडणी करताना राहिलेल्या काही त्रुटी दिग्दर्शनातही कायम राहिल्यानं निराश करतात. काही ठिकाणी लॉजिकचा वापर करण्याची गरज होती.
थोडक्यात : दीर आणि भावजय यांचं निर्मळ नातं दाखवताना मनोरंजक मसाल्यांचाही पुरेपूर वापर करण्यात आलेला हा सिनेमा मोकळा वेळ असेल तर पहायला हरकत नाही.