शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:16 PM2024-12-04T16:16:30+5:302024-12-04T16:25:54+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान तसेच प्रीती झिंटा हे कलाकार 'कल हो ना हो' चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.
Shahrukh khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh khan), सैफ अली खान(Saif Ali khan) तसेच प्रीती झिंटा (Preity Zinta) हे कलाकार 'कल हो ना हो' चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. २००३ साली हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. आजही 'कल हो ना हो' पाहिल्यानंतर प्रेक्षक भावुक झाल्याचे पाहायला मिळतात. शाहरुखने या चित्रपटामध्ये साकारलेला अमन माथुर असो किंवा प्रीतीने साकारलेली नैना यामधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंसं वाटलं. जवळपास २१ वर्षानंतर हा चित्रपट पुन: प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवाय या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. परंतु 'कल हो ना हो' मध्ये शाहरुखने ४ दिवस शूटिंग केल्यानंतर हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगण्यात येतं.
'कल हो ना हो' चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं होतं. तर करण जोहरने चित्रपटाच्या लेखनाची धुरा सांभाळली होती. परंतु बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखने काही कारणास्तव हा चित्रपट मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचा खुलासा निखिल आडवाणी यांनी अलिकडेच 'Mirchi Plus'ला दिलेल्या मुलाखतीत केला. त्यादरम्यान मुलाखतीत ते म्हणाले, "शाहरुख खानने या चित्रपटातील केवळ एकच सीन शूट केला होता. त्यानंतर अचानक त्याचा फोन आला आणि तो मला म्हणाला की, मला चित्रपटात काम करणं शक्य नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला माझ्या जागी घेऊ शकता. खरंतर त्यावेळी शाहरुख खान पाठीदुखीच्या समस्येने त्रस्त होता. त्यामुळे सर्जरी करण्यासाठी काही दिवसांसाठी तो जर्मनीला जाणार होता. फक्त आपल्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबू नये यासाठी त्याने आपल्या जागी दुसऱ्या कलाकारला कास्ट करावं, असं सूचवलं होतं. "
पुढे ते म्हणाले, "शाहरुखने तेव्हा आपल्या जागी सलमानचं नाव सूचवलं आणि तो म्हणाला की, मी याबद्दल त्याच्यासोबत बोलतो. तुम्ही हा चित्रपट सलमानला सोबत घेऊन पूर्ण करा. पण, आम्ही तसं काही केलं नाही. जेव्हा शाहरुख पूर्णपणे बरा झाल्यावर चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं." असं त्यांनी सांगितलं.