बॉलिवूडच्या या ‘आई’ला पोटच्या पोरांनी न संपणारं ‘दु:ख’ दिलं; अखेरच्या दिवसात झाले प्रचंड हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:25 PM2022-01-04T14:25:33+5:302022-01-04T14:29:18+5:30
Nirupa Roy Birth Anniversary : बॉलिवूडची ‘माँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरुपा रॉय यांचा जीवन प्रवास ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी
Nirupa Roy Birth Anniversary : ‘मेरे पास माँ है’, या एका डायलॉगने शशी कपूरने ‘दीवार’ हा एक सिनेमा गाजवला. या सीनमधील ‘माँ’ होती निरूपा रॉय. होय, ज्या आईभोवती हा सीन रचला होता, तिचं नाव निरूपा रॉय (Nirupa Roy) .रूपेरी पडद्यावर आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या निरूपा आज आपल्यात नाहीत. आज त्यांचा वाढदिवस. 1931 साली आजच्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारीला त्यांचा जन्म झाला होता.
निरूपा यांचं खरं नाव कोकिला किशोरचंद्र बुलसारा. घरच्यांनी 15 व्या वर्षी लग्न लावून दिलं आणि कोकिला पतीसोबत मुंबईत दाखल झाली. एका चाळीत तिचा संसार सुरू झाला. कोकिलाचे पती कमल रॉय यांना सिनेमात काम करायची भारी हौस होती. मुंबईत अनेक ठिकाणी ते ऑडिशन देत. सोबत पत्नीलाही नेत. एकदिवस एका गुजराती पेपरमध्ये त्यांनी जाहिरात बघितली. सिनेमासाठी कलाकार हवेत, अशी ती जाहिरात. मग काय, कमल रॉय पत्नीला घेऊन ऑडिशनला पोहोचले. कमल रॉय यांना भूमिका मिळाली नाही. पण कोकिला मात्र पास झाली आणि तिला ती भूमिका मिळाली. चित्रपटाचं नाव होतं ‘रनकदेवी’. इथून कोकिला हे नाव बदलून ती निरूपा रॉय झाली. हळूहळू निरूपा सिनेमात मशहूर झाल्या.
सुरूवातीला लीड भूमिका साकारणाऱ्या निरूपांना काही काळानंतर वहिनी आणि आईच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. पण या भूमिकाही निरूपा यांनी आनंदानं स्वीकारल्या. विशेषत: आईच्या भूमिका त्यांनी लिलया पेलल्या. पण आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या याच निरूपा यांचे पोटच्या पोराने मात्र चांगलेच हाल केलेत.
निरूपा यांनी अगदी 150 रूपये महिन्यांनी सिनेमात काम केले. पण हळूहळू हवं ते सगळं त्यांना मिळालं. मुंबईत नेपियन सी रोडवर निरूपा रॉय यांनी 1963 मध्ये 10 लाखात घर घेतलं. गाडी घेतली. चाळीत राहणारं कुटुंब अलिशान आयुष्य जगू लागलं. पण निरूपा यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं किरण व योगेश यांच्यात संपत्तीवरून वाद पेटला. हा वाद चव्हाट्यावर आल्यावर प्रत्येक जण हैराण झाला होता.
2004 मध्ये निरूपा यांचं निधन झालं आणि आईच्या घरासाठी किरण व योगेश या दोन मुलांमध्ये वाद सुरू झाला. 2015 मध्ये निरूपा यांच्या पतीचाही मृत्यू झाला. यानंतर हा वाद कोर्टात पोहोचला होता. निरूपा यांची दोन्ही मुलं किचन, गार्डन एरिया व बेडरूमसाठी एकमेकांसोबत भिडले होते.
किरणने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला होता. ‘माझ्या आईने तिची संपूर्ण संपत्ती व दुसरा फ्लॅट माझ्यावर नावावर केला. कारण माझा भाऊ योगेश व त्याची पत्नी आई व बाबांसोबत वाईट वागत.आई बाबा जिवंत असताना योगेशने त्यांना खूप दु:ख दिलं, त्यांचा छळ केला, असा खळबळजनक खुलासा त्याने केला होता. अर्थात योगेशने हे सर्व आरोप नाकारले होते.