चित्रपटात काम केले म्हणून निरुपा रॉय यांच्या वडिलांनी कायमचा तोडला होता संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:32 PM2021-01-05T12:32:41+5:302021-01-05T12:33:55+5:30
निरुपा रॉय यांना बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळाले असले तरी त्यांचे वडील आयुष्यात त्यांच्याशी कधीच बोलले नाहीत.
सत्तर, ऐंशीच्या दशकात आपल्याला अनेक चित्रपटात निरुपा रॉय आईच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या. निरुपा रॉय यांच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांचे कौतुक झाले आहे. निरुपा रॉय यांचा काल म्हणजेच ४ जानेवारीला वाढदिवस होता. गुजरातमधील वलसाड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी २७५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
निरुपा रॉय यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली. त्यांना अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेत तर आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळाले. निरुपा रॉय यांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लाले. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. निरुपा रॉय यांचे खरे नाव कांता चौहान असून त्यांचे आईवडील त्यांना प्रेमाने छीबी अशी हाक मारायचे. तुम्हाला विश्वास होणार नाही. पण वयाच्या केवळ १४ व्या वर्षी निरुपा यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न कमल रॉय यांच्यासोबत लावून दिले. लग्नानंतर पतीने त्यांचे नाव कोकीळा ठेवले.
निरुपा रॉय लग्न झाल्यानंतरदेखील काही वर्षं गुजरातमध्येच राहात होत्या. पण १९४५ मध्ये निरुपा त्यांच्या पतीसोबत मुंबईला आल्या. त्यांचे पती रेशनिंग इन्स्पेक्टर असले तरी त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे ते अनेक ऑडिशन्स द्यायचे. लग्नानंतर ते निरुपा रॉय यांना घेऊन एक गुजराती चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. त्या ऑडिशनला निरुपा रॉय यांचे पती रिजेक्ट झाले. पण निरुपा रॉय यांना त्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यांनी निरुपा रॉय या नावाने त्यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला सुरुवात केली. रनकदेवी या पहिल्याच चित्रपटात त्यांचे काम प्रेक्षकांना आवडले. पण त्याकाळात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने चित्रपटात काम करणे चांगले समजले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियातील सगळीच मंडळी त्यांच्यावर चिडली. काही वर्षांनंतर त्यांना यश मिळाल्यानंतर घरातील लोक त्यांच्याशी बोलू लागले. पण त्यांचे वडील आयुष्यात त्यांच्याशी कधीच बोलले नाहीत.
निरुपा रॉय यांनी हरहर महादेव या चित्रपटात साकारलेली पार्वतीची भूमिका, वीर भीमसेनमधील द्रोपदीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. दीवार या चित्रपटाती त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.