निशिकांत कामत यांचं निधन, 'लय भारी' दिग्दर्शक हरपला; रितेशचं भावुक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 05:10 PM2020-08-17T17:10:47+5:302020-08-17T17:11:05+5:30
डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी वयाच्या 50व्या वर्षी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला.
डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाची अफवा सकाळपासून सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याचे रितेश देशमुखने ट्विटरवर सांगितले होते. मात्र आज संध्याकाळी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
निशिकांत कामत यांनी वयाच्या 50व्या वर्षी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता. आज त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र हॉस्पिटलकडून त्यांची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेटिंलेटवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता संध्याकाळी 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
निशिकांत कामत यांच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान रितेश देशमुखने ट्विटरवर निशिकांत कामतसोबत गळाभेट करतानाचा फोटो शेअर करत ट्विट केले. त्यांनी म्हटले की, मित्रा तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
I will miss you my friend. #NishikantKamat Rest In Peace. 🙏🏽 pic.twitter.com/cqEeLbKJPM
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुखने ट्विट केले की, तू खूप दयाळू होता. माझ्या आयुष्यातील तू माझा प्रशिक्षक होतास. आपण खूप चर्चा केल्या आणि तू खूप चांगला व्यक्ती होतास. निशी, तूझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती मिळो.
#NishikantKamat you were one of a kind.. I found a life coach in you.. I live by so much that we discussed and I live with knowing you were such an amazing soul and I’m just so glad our paths crossed.. I will miss you dear Nishi .. R.i.p ❤️
— Genelia Deshmukh (@geneliad) August 17, 2020
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष, अमेय खोपकर यांनी ट्विटरवर लिहिले की, अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा... तुझ्याइतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही. आता तर अगदीच शांत झालास... अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास... तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता...
अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा...
तुझ्याइतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही.
आता तर अगदीच शांत झालास...
अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास...
तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास
तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 17, 2020
निशिकांत कामत यांनी 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील 'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामत यांनी 'दृश्यम', 'मदारी', 'फुगे' यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. याशिवाय, 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली 2', 'मदारी', 'भावेश जोशी' या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामत यांनी अभिनय केला.