कपाळावर चंद्रकोर अन् अस्सल पैठणी! मराठमोळ्या लूकमध्ये निता अंबानी यांचं मराठीत भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:11 PM2024-04-08T12:11:53+5:302024-04-08T12:12:23+5:30
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नीता अंबानी या अंबानी कुटुंबातील सर्वात मोठी सून आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. नीता अंबानी यांचं वय 60 वर्षे असले तरीही त्यांचे सौंदर्य आणि रुबाब वाखाण्याजोगा आहे. नीता अंबानी किती श्रीमंत आहेत हे कोणाला सांगायची गरज नाही. असे असूनही त्या नेहमीच विनम्रपणे वागताना दिसतात. कोणताही लहान-मोठा कार्यक्रम असो नीता अंबानी नेहमीच टापटिप आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या साड्या देखील नेहमीच विशेष लक्ष वेधून घेतात. नुकतेच मुंबईमधील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात नीता अंबानी यांनी नेसलेल्या पैठणीने लक्ष वेधून घेतलं.
निता अंबानी यांनी महाराष्ट्राची शान असणारी जरी काठाची हाताने विणलेली पैठणी परिधान केली होती. या पैठणीवर सुंदर फूलांची व मोरांची डिझाईन होती. कपाळावर चंद्रकोर आणि दागिणे अशा लूकमध्ये निता फारच सुंदर दिसून आल्या. वर्षपूर्तीच्या या खास कार्यक्रमात मराठमोळ्या गायक संगीतकारांची जोडी अजय-अतुलने खास सादरीकरण केलं. तर विशेष म्हणजे यावेळी या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी मराठीत भाषण केलं.
'नमस्कार मंडळी, कसे आहात' असं म्हणतं त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आलेल्या सर्वांच खूप-खूप स्वागत. एक वर्ष संपल पण. किती छान वर्ष होतं. आपल्या देशाचं आणि संस्कृतीचं नाव संपूर्ण जगात उज्वल व्हावं, हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आहात म्हणूनच या सर्व कला जिवंत आहेत, तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे. तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे. तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. धन्यवाद' असं नीता अंबानी या कार्यक्रमात प्रेक्षकांना म्हणाल्या.
निता यांनी अजय-अतुल यांना स्टेजवर बोलावत त्यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, 'हे दोघे भाऊ संगीत वेडाने झपाटलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे म्हणून मला माहित आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही तर खूप चांगले व्यक्तीही आहेत' असं नीता अंबानी अजय अतुलबद्दल म्हणाल्या. या कार्यक्रमात अजय-अतुल यांनी देवा श्री गणेशा सारख्या भक्ती गीतापासून ते झिंगाटपर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आणि उपस्थितांचं मनोरंजन केलं.