प्रसिद्ध अभिनेत्रीनं गमावलं तिचं नवजात बाळ; 5 वर्ष सहन केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 05:27 PM2023-07-20T17:27:51+5:302023-07-20T17:29:12+5:30
Celina jaitley: २०१७ मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, त्या दोघांपैकी एका बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला
सेलिना जेटली हे नाव सध्या कोणालाही नवीन नाही. बॉलिवूडमध्ये अगदी मोजक्या सिनेमांमध्ये झळकलेल्या सेलिनाने प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप उमटवली आहे. 'नो एण्ट्री', 'अपना सपना मनी मनी', 'गोलमाल रिटर्न्स' , शकालाका बूमबूम अशा काही मोजक्या सिनेमांमध्ये ती झळकली. मात्र, त्यानंतर तिने सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. सध्या सेलिना ऑस्ट्रियामध्ये स्थायिक आहे. सध्या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचं सर्वात मोठं दु:ख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
सेलिना तीन मुलांची आई आहे. तिने २०१२ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये ती प्रेग्नंट होती. यावेळीदेखील तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, त्या दोघांपैकी एका बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रसंगाविषय़ी तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
काय आहे सेलिनाची पोस्ट?
"आम्ही आमच्या जुळ्या मुलांपैकी एका बाळाला शमशेरला हृदयाच्या आजारामुळे गमावलं. माझ्या वडिलांच्या निधनामुळे मला प्रेग्नंसीच्या ३२ व्या आठवड्यात अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या. पीटर आणि माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता. पण, आमच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी आम्हाला आनंदी रहावं लागलं होतं. मी शमशेरा आणि आर्थर अशा दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. पण, हृदयाचा आजार असल्यामुळे शमशेरा आम्हाला सोडून गेला. त्याच्या मृत्यूमुळे आम्ही खूप हादरलो होतो. पण, त्यावेळी आम्हाला आर्थरचीही तितकीच काळजी घ्यायची होती. त्याच्यासाठी आम्ही एक महिना दुबईमध्ये राहिलो", असं सेलिनाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मला ५ वर्ष लागली. पण, माझ्या नवऱ्यामुळे मी आज या विषयावर धाडस करुन बोलू शकले. या पाच वर्षात मी फक्त बाळ गमावल्याचं दु:ख सहन केलं. पण, ज्या पालकांच्या आयुष्यात हा प्रसंग आला आहे ते या दु:खावर मात करु शकतात हेच यातून मला आणि पीटरला सांगायचं आहे."
दरम्यान, सेलिनाने ही पोस्ट शेअर करत तिच्या बाळाचा फोटो दाखवला आहे. सेलिनाने तिच्या करिअरची सुरुवात फॅशन जगतापासून केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही वर्ष अभिनय केल्यानंतर तिने इंडस्ट्रीमधूनही ब्रेक घेतला. २०११ मध्ये तिने ऑस्ट्रियन हॉटेल व्यावसायिक पीटर हाग याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तिने २०१२ मध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर २०१७ मध्ये ती पुन्हा आई झाली.