राम गोपाल वर्मांना अटक होणार! अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टाने सुनावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:43 IST2025-01-23T10:42:52+5:302025-01-23T10:43:42+5:30
नेमकं प्रकरण काय?

राम गोपाल वर्मांना अटक होणार! अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टाने सुनावली शिक्षा
'सत्या', 'वास्तुशास्त्र', 'सरकार' अशा एकपेक्षा एक दमदार सिनेमांचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ran Gopal Varma) वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. अनेकदा ते वादग्रस वक्तव्य किंवा ट्वीट करतात. त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान आता राम गोपाल वर्मांच्या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघालं असून त्यांना तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण सात वर्ष जुनं आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीन वॉरंट जारी झालं आहे. त्यांना ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंधेरी सत्र न्यायालयाने मंगळवारी चेक बाऊन्स प्रकरणात दिग्दर्शकाला ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी गेल्या ७ वर्षांपासून सुरु होती. मंगळवारी राम गोपाल वर्मा स्वत: कोर्टात हजर नव्हते. म्हणून कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यांच्या कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसंच तीन महिन्यात वर्मांना ३.७२ लाखांची भरपाईही द्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांना आणखी ३ महिने जेलमध्ये राहावे लागेल.
२०१८ मध्ये श्री नामक कंपनीकडून महेशचंद्र मिश्रा यांनी राम गोपाल वर्मां यांच्या फर्म विरोधात तक्रार दाखल केली होती. जून २०२२ मध्ये कोर्टाने या प्रकरणात वर्मांना ५००० रुपये दंड आकारला होता आणि जामीन देण्यात आलं होतं. मंगळवारी न्यायाधीश वाय पी पुजारी यांनी म्हणाले की कोणताही सेट ऑफ देण्याचा प्रश्नच येत नाही कारण आरोपी ट्रायलवेळी कोणताही काळ कस्टडीत नव्हता. यानंतर आता राम गोपाल वर्मा पुढील कोर्टात अपील करणार की त्यांना तुरुंगात जावं लागणार हे पाहणं महत्वाचं आहे.