आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:23 AM2024-05-21T10:23:00+5:302024-05-21T10:24:04+5:30
आमिर खान(Aamir Khan)चा 'गजनी' (Gajini Movie) १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ धुमाकूळ घातला नाही तर मन हेलावून टाकणाऱ्या कथेने प्रेक्षकांनाही रडवले.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)चा 'गजनी' (Gajini Movie) चित्रपट आठवतोय का? १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ धुमाकूळ घातला नाही तर आपल्या मन हेलावून टाकणाऱ्या कथेने प्रेक्षकांनाही रडवले. अभिनयापासून गायनापर्यंत कलाकार प्रसिद्ध झाले. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रदीप रावत(Pradip Rawat)ने आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की तो चित्रपटात 'रागीट' सलमान खान(Salman Khan)ला कास्ट करण्याच्या विरोधात होता, तर त्यानेच एआर मुरुगदास यांना 'शांत स्वभावाच्या' आमिर खानचे नाव सुचवले होते.
'गजनी' हा चित्रपट २००५ मध्ये आलेल्या याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जेव्हा तामिळ चित्रपट सुपरहिट झाला तेव्हा दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांनी तो हिंदीतही बनवण्याचा विचार केला. हा सिनेमा हिंदीत बनवण्याची त्यांची इच्छा होती. त्यानंतर प्रदीपने त्यांना सलमान खानऐवजी आमिर खानचे नाव सुचवले. रागीट सलमानला कास्ट करण्याच्या बाजूने नसल्याचेही त्याने सांगितले. आमिर अतिशय शांत स्वभावाचा असल्याने त्याची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली.
याबद्दल बोलताना अभिनेता प्रदीप रावतने सलमान खान या भूमिकेसाठी का योग्य नाही याचा खुलासा केला. तो म्हणाला, एआर मुरुगदास म्हणत होते की 'मला हिंदीत गजनी बनवायचा आहे.' माझ्या मनात विचार आला की 'सलमान खान रागीट आहे आणि एआर मुरुगादॉस इंग्रजी किंवा हिंदी बोलत नाहीत. तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्वही नव्हते.' आमिरसोबत 'सरफरोश' (१९९९) सारख्या चित्रपटात काम केलेल्या प्रदीपला वाटले की त्याच्या 'शांत' स्वभावामुळे आमिर चित्रपटासाठी अधिक योग्य आहे.
या भूमिकेसाठी आमिर योग्य असेल असे...
७२ वर्षीय प्रदीप रावत पुढे म्हणाला, 'मला वाटले की या भूमिकेसाठी आमिर योग्य पर्याय असेल, कारण तो शांत स्वभावाचा आहे आणि सर्वांशी आदराने वागतो. गेल्या २५ वर्षांत मी आमिरला कोणावर ओरडताना किंवा चिडताना पाहिलेले नाही. त्याने कधीही कोणाचा अपमान केला नाही किंवा अपमानास्पद भाषा वापरली नाही. म्हणूनच मला वाटले की स्वभावाने सलमानवर नियंत्रण ठेवता येत नाही, नाहीतर अनावश्यक समस्या निर्माण होतील.
'गजनी'मध्ये होती ही स्टारकास्ट
'गजनी' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाविषयी सांगायचे तर, हा चित्रपट एआर मुरुगदास यांनी दिग्दर्शित केला होता, ते त्याचे सहलेखकही होते. या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यामध्ये आमिर खान व्यतिरिक्त असिन, जिया खान आणि प्रदीप रावत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाद्वारे असिनने हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ती मूळ चित्रपटाचाही एक भाग होती.