मंदाकिनी नव्हे तर राज कपूर यांना या अभिनेत्रीला घेऊन बनवायचा होता 'राम तेरी गंगा मैली', पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:01 IST2025-01-02T14:00:39+5:302025-01-02T14:01:33+5:30
Ram Teri Ganga Maili Movie : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर दिग्दर्शित 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात राजीव कपूर आणि मंदाकिनी मुख्य भूमिकेत होते. १९८५ मध्ये आलेल्या या सिनेमातील मंदाकिनीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, पण यासाठी ती निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.

मंदाकिनी नव्हे तर राज कपूर यांना या अभिनेत्रीला घेऊन बनवायचा होता 'राम तेरी गंगा मैली', पण...
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) दिग्दर्शित 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटात राजीव कपूर (Rajiv Kapoor) आणि मंदाकिनी (Mandakini) मुख्य भूमिकेत होते. १९८५ मध्ये आलेल्या या सिनेमातील मंदाकिनीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, पण यासाठी ती निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. हा सिनेमा आणखी एका अभिनेत्रीला ऑफर झाला होता, ज्यासाठी तिने फोटोशूटही केले होते. अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीनेच याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री आता राजकारणातही सक्रिय झाल्या आहेत.
विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत, राजकारणी आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी खुलासा केला की, राज कपूर यांच्या लोकप्रिय चित्रपट राम तेरी गंगा मैलीसाठी त्या निर्मात्यांची पहिली पसंती होत्या, परंतु एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेत्रीला भूमिका मिळू शकली नाही.
राम तेरी गंगा मैली या चित्रपटाविषयी बोलताना खुशबू म्हणाल्या, राज कपूर जी मला राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून लॉन्च करणार होते. यासाठी आम्ही फोटोशूटही करून घेतले. ते फोटो बघताच कपूर साहेब म्हणाले होते, हीच माझी गंगा आहे. सुरुवातीला गंगोत्री शेड्यूल संपवण्याचा प्लान होता, पण त्यावेळी खूप बर्फवृष्टी होत होती, म्हणून त्यांनी आधी कोलकात्यात शूटिंग करायचं ठरवलं, तिथून सिनेमात वेश्यागृहाचा सीन दाखवण्यात आला होता. चित्रपटाच्या या भागात, पात्र आधीच एका मुलाची आई आहे.
या कारणामुळे हातून निसटला सिनेमा
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांनी राम तेरी गंगा मैलीमध्ये भूमिका न मिळण्याचे कारण सांगितले. वास्तविक, चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी खुशबू सुंदर यांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी होते. अशा परिस्थितीत त्यांना आईच्या भूमिकेत दाखवणे राज कपूर यांना योग्य वाटले नाही. खुशबू म्हणाल्या की, 'मी १४ वर्षांचीही नव्हते, तेव्हा राज जी म्हणाले की ती स्वतः लहान मुलासारखी दिसेल आणि तिच्या हातातले मूल अजिबात बरोबर दिसणार नाही. त्यामुळे मला या चित्रपटात काम करता आले नाही.