'मैने प्यार किया'साठी सलमान खानला नव्हती पहिली पसंती; 'या' अभिनेत्याला आली होती चित्रपटाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:41 PM2023-11-08T12:41:17+5:302023-11-08T12:44:48+5:30
'मैने प्यार किया' चित्रपटासाठी सलमान खान हा पहिली चॉईस नव्हता.
'मैने प्यार किया' हा सुपरडुपर हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट. सूरज बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या सिनेमातसलमान खान आणि भाग्यश्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने अभिनेता सलमान खानला खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. पण सलमान खान हा सुरज बडजात्याची या भूमिकेसाठी पहिली चॉईस नव्हता.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पियुष मिश्रा यांनी 'मैने प्यार किया' या आयकॉनिक चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. 'मैने प्यार किया'मधील प्रेमच्या भूमिकेसाठी सलमान निर्मात्यांची पहिली पसंती नसल्याचे त्यांनी सांगितले. पियुष मिश्रा यांना 'मैने प्यार किया' ऑफर करण्यात आला होता.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले, 'मी नवी दिल्लीतील NSDमध्ये शिकत होतो, ही तेव्हाची गोष्ट आहे. माझे NSD मध्ये तिसरे वर्ष चालू होते आणि एके दिवशी NSD चे तत्कालीन संचालक मोहन महर्षीजींनी सूरज बडजात्याचे वडील राजकुमार बडजात्या यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा सूरज एक चित्रपट बनवणार आहे'.
'ज्यात मुख्य अभिनेत्री म्हणून भाग्यश्रीला कास्ट केले जाईल. तर ते एका अभिनेत्याच्या शोधात आहेत. त्यांनी मला चित्रपटातील प्रेमची भुमिका ऑफर केली. पण मी या चित्रपटाला हो म्हणालो नाही आणि त्यावेळी मी खूप देखणा दिसायचो. मी या चित्रपटाला का नाही म्हटले हे मलाच समजले नाही', असे पियुष मिश्रा यांनी सांगितले.
सलमान खानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. पण 1989 मध्ये रिलीज झालेल्या 'मैने प्यार किया' मधून सलमानला विशेष ओळख मिळाली. या सिनेमाला मिळालेल्या अफाट यशानंतर सलमानने ९० च्या दशकात सातत्याने अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटानंतर तरुणाई प्रेमाकडे नव्या नजरेने पाहू लागली. तर चित्रपटातील गाणी आजही लोकांना आठवतात.