कहानी में ट्वीस्ट: शाहरूख खान नाही तर ऐश्वर्याराय बच्चनमुळे टळली ‘ती’ दुर्घटना!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:39 AM2019-11-01T11:39:22+5:302019-11-01T11:40:42+5:30
अमिताभ बच्चन यांच्या घरी आयोजित दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर अर्चना सदानंद हिच्या लहंग्याला अचानक आग लागली आणि शाहरूख खानने त्वरित अर्चनाला बाजूला करून आपल्या शेरवानीने आग विझवली. पण आता या कहाणीत एक ट्वीस्ट आला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या घरी आयोजित दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर अर्चना सदानंद हिच्या लहंग्याला अचानक आग लागली आणि शाहरूख खानने प्रसंगावधान राखत त्वरित अर्चनाला बाजूला करून आपल्या शेरवानीने आग विझवली, ही बातमी तुम्ही वाचली असेलच. या बातमीनंतर सोशल मीडियावर शाहरूखचे वारेमाप कौतुक झाले. फराह खान हिनेही शाहरूखला ‘रिअल हिरो’ संबोधत त्याचे कौतुक केले. पण आता या कहाणीत एक ट्वीस्ट आला आहे. होय, शाहरूख नाही तर खुद्द ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या मॅनेजरच्या लहंग्याला लागलेली आग विझवली होती, असा दावा केला जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने बुधवारी मध्यरात्री या घटनेवर प्रकाश टाकणारी संबंधित बातमी प्रकाशित केली होती. या बातमीवर त्यावेळी अनेकांचे लक्ष गेले नाही. पण गुरुवारी संपूर्ण दिवसभर या बातमीच्या लिंक्स बी-टाऊनमध्ये शेअर केल्या गेल्यात. या बातमीत केलेल्या दाव्यानुसार, अर्चना सदानंद हिच्या लहंग्याला आग लागताच, सर्वप्रथम ऐश्वर्या रायने तत्परता दाखवली. ऐश्वर्या अर्चनाच्या बाजूलाच उभी होती. लहंग्याने पेट घेताच ऐश्वर्याने अर्चनाचा लहंगा फाडून तो तिच्या शरीरापासून दूर केला आणि आग विझवली. यानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या शाहरूखने स्वत:ची शेरवानी काढून ती अर्चनाच्या अंगावर लपेटली. म्हणजेच काय, तर आग विझवली ती ऐश्वर्याने. तिच्याच प्रसंगावधानाने एक मोठी दुर्घटना टळली. असे असताना शाहरूखच्या टीमने त्याला या घटनेचा ‘हिरो’ का बनवले, हे मात्र कळायला मार्ग नाही.
बुधवारी ‘मिड डे’ने सर्वप्रथम या घटनेचे वृत्त प्रकाशित केले होते आणि अर्चनाला वाचवण्याचे संपूर्ण श्रेय शाहरूखला दिले होते. या घटनेत ऐश्वर्याची मॅनेजर अर्चना हिला काही इजा झाली आहे. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.