Janhit Mein Jaari Movie Review: एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:20 PM2022-06-10T15:20:03+5:302022-06-10T15:34:14+5:30

Janhit Mein Jaari Movie Review in marathi : हा चित्रपट कंडोम वापरण्याविषयी जनजागृती करतो. एका तरुणीच्या माध्यमातून याचा प्रसार करताना कंडोमबाबतच्या संकुचित विचारांना मूठमाती देतो...

Nushrratt Bharuccha starrer Janhit Mein Jaari Movie Review in marathi | Janhit Mein Jaari Movie Review: एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू

Janhit Mein Jaari Movie Review: एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू

googlenewsNext

 - संजय घावरे
...........................
 

दर्जा :  साडे तीन  
कलाकार : नुसरत भरूचा, अनुद सिंह ढ़ाका, विजय राज, पारितोष त्रिपाठी, बृजेंद्र काला, टिनू आनंद
दिग्दर्शक : जय बसंतू सिंह
निर्माता : विनोद भानुशाली
शैली : कॉमिडी-ड्रामा
कालावधी : २ तास २७ मिनिटे
...........................

Janhit Mein Jaari Movie Review: : आजही आपल्या देशात स्वच्छतेपासून सुरक्षित संबंध, लोकसंख्या वाढ आणि कंडोम वापरण्यासारख्या बऱ्याच गोष्टींबाबत जनजागृती करावी लागत आहे. असं असूनही एड्ससारख्या महाभयंकर आजारामुळं मृत्यूचं प्रमाण वाढत असून, जन्माचं प्रमाण कमी होण्याचं नाव घेत नाहीये. हा चित्रपटही याच गोष्टींकडं लक्ष वेधत कंडोम वापरण्याविषयी जनजागृती करतो. एका तरुणीच्या माध्यमातून याचा प्रसार करताना कंडोमबाबतच्या संकुचित विचारांना मूठमाती देतो. लेखक राज शांडील्य यांनी मनोरंजनाच्या सर्व मसाल्यांचा वापर करून लिहिलेलं कथानक दिग्दर्शक जय बसंतू सिंग यांनी तितक्याच चांगल्या प्रकारे सादर केलं आहे.

चित्रपटाची कथा मनोकामना उर्फ मन्नू या तरुणीभोवती गुंफण्यात आली आहे. मुलगा होईल या आशेनं चार मुलींना जन्म देणाऱ्या माता-पित्याच्या पोटी जन्मलेल्या मन्नूचे विचार खूप वेगळे असतात. तिला केवळ आईप्रमाणं लग्न करून मुलांना जन्म द्यायचा नाही, तर नोकरी करून स्वावलंबी बनायचं आहे. नोकरी किंवा लग्न यापैकी एक निवडण्यासाठी तिला एक महिन्याची मुदत मिळते. नोकरी मिळाली नाही तर तिला लग्नासाठी होकार द्यायचा असतो. बऱ्याच ठिकाणी नकार मिळाल्यावर तिला एका कंडोम बनवणाऱ्या कंपनीमध्ये प्रॉडक्टचं प्रमोशन करण्याची नोकरी मिळते. लग्नापासून दूर पळणारी मन्नू अखेर नोकरी स्वीकारते आणि यादरम्यान मनोरंजन नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते, त्याच्याशी विवाह करते, सासरच्यांकडून नोकरीसाठी विरोध झाल्यावर नोकरी सोडते, पण एका वळणावर या नोकरीच्या माध्यमातून होणारी जनजागृती तिच्या आयुष्याचं ध्येय बनते.

लेखन-दिग्दर्शन : शहरी भागांमध्ये जरी बऱ्यापैकी कंडोम आणि लोकसंख्या वाढीबाबत अवेअरनेस आला असला तरी ग्रामीण भागांत याची खरी गरज आहे. त्यामुळं सुरेख ‘वनलाईन’वर तितकाच चांगला सिनेमा बनवताना तरुणाऐवजी तरुणीच्या खांद्यावर या मोहिमेची पताका देण्यात आली आहे.

चित्रपटातील घटना वेगात घडत असल्यानं कथाही वेगात पुढे सरकते. त्या जोडीला दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि संवादांच्या माध्यमातून प्रासंगिक विनोदनिर्मिती करण्यात आल्यानं अनाहुतपणे हसू येतं. क्लायमॅक्सपूर्वीची काही दृश्य वेळकाढूपणा करतात, पण लगेच पुन्हा मूळ ट्रॅकवर येतात. कंडोमबाबतचे गैरसमज, संकुचित वृत्ती, समाजाबाबतचे भय, कंडोमचा वापर न केल्यानं होणारे दुष्परिणाम, स्त्रियांना होणारे आजार यांसारख्या बºयाच गोष्टींचा समावेश करताना एक छानशी लव्हस्टोरीही गुंफण्यात आली आहे. आजपर्यंत काही चित्रपटांमध्ये अशा प्रकारचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी यात तरुणीच्या माध्यमातून कथा सादर केली जाणं हे वेगळेपण आहे. लव्ह स्टोरीवर जास्त वेळ वाया घालवण्यात आलेला नाही. गाणी कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारी आहेत. ‘पर्दा दारी...’ आणि ‘उडा गुलाल इश्क वाला...’ ही गाणी श्रवणीय आहे. कॅमेऱ्यापासून कॉस्च्युम, वातावरण निर्मिती आणि गीत-संगीतापर्यंत सर्वच गोष्टी चांगल्या आहेत.

अभिनय : या चित्रपटातील कलाकार म्हणजे अक्षरश: नमूने आहेत. स्त्रीप्रधान भूमिकेत नुसरत भरूचासाठी (Nushrratt Bharuccha ) ही खूप मोठी संधी होती. तिनं झोकून देऊन काम केल्याची जाणीव होते. या जोडीला अनुद सिंह ढ़ाका देखील मुख्य भूमिकेत प्रभावित करण्यात यशस्वी झाला आहे. अभिनयापासून नृत्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यानं बाजी मारली आहे. विजयराजनं पुन्हा एकदा अगदी सहजपणे आपली भूमिका साकारली आहे. टिनू आनंद यांनी साकारलेले अंध आजोबाही ऐन वेळी काहीतरी मार्मिक बोलतात. बृजेंद्र काला यांनी साकारलेला शांत बॉस आणि परितोष त्रिपाठीनं साकारलेला प्रेमी छान झाला आहे. इतर सर्वच कलाकारांनी आपापल्या परीनं विविध व्यक्तिरेखांमध्ये वास्तववादी रंग भरले आहेत.

सकारात्मक बाजू : एक संवेदनशील विषय प्रथमच तरुणीच्या माध्यमातून सादर करताना मनोरंजनाच्या पूर्ण मसाल्यांचाही गरजेनुसार वापर करण्यात आला आहे.

नकारात्मक बाजू : आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये कंडोमबाबतचं कथानक पाहिलं असल्यानं कदाचित काहींना पुन्हा त्याच विषयावर चित्रपट पहाणं आवडणार नाही.

थोडक्यात : चित्रपटाचा विषय जरी गंभीर असला तरी तो मनोरंजक पद्धतीनं सादर करण्यात आला आहे. लेखनापासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत बऱ्याच जमेच्या बाजू असल्यानं हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही.

Web Title: Nushrratt Bharuccha starrer Janhit Mein Jaari Movie Review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.