नुसरत भरुचाने व्हिडीओ शेअर करत सांगितला इस्रायलमधला थरारक अनुभव, म्हणाली- 'हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 06:09 PM2023-10-10T18:09:19+5:302023-10-10T18:13:20+5:30
अभिनेत्री नुसरत भरुचाने एक व्हिडीओ पोस्ट करत इस्त्रायलमधील थरारक अनुभव शेअर केला.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्धात भारतीय अभिनेत्री नुसरत भरुचा चांगलीच चर्चेत आली. शनिवारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यामुळे या युद्धाला तोंड फुटले. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. तर असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. अशा स्थितीत अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. पण ती रविवारी सुखरुपरित्या भारतात परतली. यानंतर ती माध्यमांसमोर आली नव्हती. अखेर तिने आज एक व्हिडीओ पोस्ट करत भारत आणि इस्रायल सरकारचे आभार मानलेत.
आपल्या इन्स्टाग्रांंमवर नुसरतने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती म्हणते की, "मी घरी आहे आणि सुरक्षित आहे. माझी काळजी केल्याबद्दल सर्वांचे आभार. पण, दोन दिवसांपुर्वी जेव्हा हॉटेलमध्ये उठले होते, तेव्हा सायरन आणि बॉम्बस्फोटाचे आवाज येते होते, आम्हाला एका बेसमेंटमध्ये, तेथून शेल्टरमध्ये सुरक्षित हलवण्यात आलं. मी कधीच यापुर्वी अशा परिस्थितीमध्ये राहिले नव्हते. पण, आज जेव्हा मी माझ्या घरात अगदी शांत वातावरणात उठले तर तेव्हा आपण किती सुरक्षित आहोत, याची मला जाणीव झाली".
पुढे ती म्हणते, "ही खरचं एक खूप मोठी गोष्ट आहे. आपण किती भाग्यवान आहोत की, सुरक्षितपणे भारतात राहत आहोत. युद्दजन्य परिस्थितीतून मी माझ्या घरी, माझ्या देशात सुखरुप परत येऊ शकले, यासाठी भारत सरकार आणि इस्रायल सरकारचे आभार, त्यांच्यामुळेच हे शक्य झालं ". शिवाय, युद्धात अडकलेल्या लोकांसाठी नुसरते पार्थना केली आणि लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आशाही तिने व्यक्त केली.
नुसरत हाइफा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती. पण, युद्ध सुरु झाल्याने नुसरत तिथेच अडकली. अखेर दुतवासाच्या मदतीने नुसरत दुबईमार्गे इस्रायलमधून भारतात परतली. रविवारी मुंबई विमानतळावरील अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. या फोटो-व्हिडीओमध्ये नुसरत घाबरलेली दिसत होती.
मुंबई विमानतळावर मीडियासोबत बोलताना नुसरत म्हणाली,"आता माझ्या देशात आले आहे. मला आधी घरी जायचं आहे. कृपया मला माझ्या गाडीपर्यंत जाऊद्या. मला थोडा वेळ द्या". नुसरत मायदेशी सुखरूप परतल्याने तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.