A R Rahman Neha Kakkar: "असं करणारी तू आहेस कोण?"; एआर रहमान नेहा कक्करवर संतापले..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 01:55 PM2022-09-27T13:55:17+5:302022-09-27T13:56:22+5:30
O Sajna Song: नेहा कक्करच्या 'ओ साजना' गाण्यावरुन सुरू आहे वादंग
A R Rahman Neha Kakkar, O Sajna: बॉलिवूडची गायिकानेहा कक्करच्या 'ओ सजना' या नव्या गाण्याने रिमिक्स गाण्यांबाबतचा वाद पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतो आहे. फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' या सदाबहार गाण्याचे रिमिक्स व्हर्जन बनवल्याने नेहा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. फाल्गुनी पाठकहीनेहा कक्करवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या वादात काही गायकांनी फाल्गुनीला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी नेहाच्या समर्थनार्थ मतं मांडली आहेत. तशातच आता संगीत क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे एआर रहमान यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे.
एआर रहमान यांनी रिमिक्स संगीत संस्कृतीबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी नेहा कक्करचे नाव घेतले नाही, पण त्यांचे इंडियाटुडेशी बोलतानाचे शब्द अप्रत्यक्षपणे तिला टोमणे मारणारेच होते. एआर रहमान म्हणाले, "हल्ली रिमिक्स गाणी जितकी जास्त दिसत आहेत, तितकीच ती गाणी विकृत होत जात आहेत. आता हळूहळू संगीतकाराचा हेतूही विकृतीकडे झुकत चालला आहे. काही संगीतकार गाणं रिमिक्स करताना म्हणातात की मी त्या गाण्याची पुन्हा मांडणी आणि कल्पना केली आहे. तू आहेस कोण एखाद्या गाण्याची पुन्हा मांडणी व कल्पना करणारी? मी नेहमी दुसऱ्याच्या कामाची काळजी घेत असतो. प्रत्येकाने इतरांच्या कलेचा आदर राखायला हवा. रिमिक्स म्हणजे ग्रे एरिया आहे असं मला वाटतं आणि यातून संगीतविश्वाने लवकरात लवकर बाहेर निघायला हवे."
एखाद्या संगीतकाराने, निर्माते-दिग्दर्शकांच्या विनंतीनुसार आधुनिक टच देण्यासाठी स्वतःच्या ट्यूनचे रिमिक्स किंवा रिमेक कसे करावे? असा प्रश्न रहमानला विचारण्यात आला. त्याचे त्याने उत्तर दिले. "आमच्याकडे तेलुगू म्युझिक लाँच झाले होते आणि निर्मात्याने सांगितले की तुम्ही आणि मणिरत्नम यांनी 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटासाठी जी काही गाणी संगीतबद्ध केली आहेत, ती ताजी वाटतात. कारण ते डिजिटली मास्टर्ड झाले आहेत. त्यात ती गुणवत्ता आधीपासूनच आहे आणि प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहेत. म्हणून जर आपल्याला असे काही करायचे असेल तर आपल्याला ते पुन्हा तयार करावे लागेल. अर्थात लोक परवानगी घेतात पण तुम्ही नवीन काहीतरी घेऊन त्याचा पुन्हा रिमिक्स करू शकत नाही. कारण ते फारच विचित्र वाटतं," असे रहमान यांनी उत्तर दिले.