या बॉलिवूडच्या अभिनेत्याने अभिनयक्षेत्रात प्रवेश करण्याआधी बँकेत केली आहे नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 06:00 AM2019-07-22T06:00:00+5:302019-07-22T06:00:02+5:30
हा अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत आहे.
ऑफिस या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसिरिजच्या कथेला, यामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरिजमध्ये मुकूल चड्डा बॉसच्या भूमिकेत दिसत आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्याने याआधी आय मी और मैं, एक मैं और एक तू, गुरगाँव यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकूलला आता एक अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली असली तरी त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका बँकेत काम केले होते.
मुकूल गेल्या अनेक वर्षांपासून भारतातच राहात आहे. पण त्याआधी तो अनेक वर्षं न्यूयॉर्कमध्ये राहात होता. तेथील एका बँकेत तो एका चांगल्या हुद्द्यावर काम करत होता. याविषयी तो सांगतो, न्यूयॉर्कच्या एका बँकेत मी रिसर्च अॅनालिस्ट म्हणून काम करत होतो. मी बँकेत काम करत असलो तरी अभिनयाची मला आवड होती. त्यामुळे तिथे मी एक थिएटर ग्रुप सुरू केला होता. तसेच मी तेथील एका प्रसिद्ध थिएटर इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचे क्लासेस घेत होतो. सहा वर्षं नोकरी केल्यानंतर आपण भारतात परतावे आणि दोन वर्षांचा ब्रेक घेऊन रंगमचावर काम करावे असे मी ठरवले होते. त्यामुळे मी काम करण्यासाठी भारतात आलो. येथे आल्यावर काही नाटकात काम केले. त्यानंतर मला जाहिरातीत काम करायला मिळाले. काहीच वर्षांत चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी भारतातच स्थायिक व्हायचे ठरवले.
मुकूलने चित्रपटांमध्ये अनेक वर्षं काम केले आहे. चित्रपट आणि वेबसिरिज या माध्यमांमध्ये काम करताना काही फरक जाणवतो का असे विचारले असता तो सांगतो, मोठा पडदा आणि वेबसिरिज ही केवळ वेगवेगळी माध्यमं आहेत. पण दोन्ही माध्यमात एक कलाकार म्हणून तुम्हाला अभिनयच करायचा असतो. त्यामुळे या माध्यमांमध्ये काही फरक आहे असे मला वाटत नाही. केवळ वेबसिरिजची संख्या वाढल्याने दर्शकांना मनोरंजनासाठी एक माध्यम मिळाले आहे आणि कलाकारांना अधिकाधिक काम मिळत आहे असे मला वाटते.