तिरुपती मंदिरासमोर ओम राऊतनं केलं क्रिती सनॉनला Kiss, आले ट्रोलर्सच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 12:12 PM2023-06-08T12:12:12+5:302023-06-08T12:12:56+5:30
साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) बहुप्रतिक्षीत चित्रपट आदिपुरुष (Adipurush) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. दरम्यान आता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत(Om Raut)च्या 'आदिपुरुष' (Adipurush) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून अनेक वाद निर्माण झाले आहेत. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या चित्रपटाशी संबंधित स्टारकास्टच्या बातम्याही समोर येऊ लागल्या आहेत. त्याच वेळी, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी, ओम राऊत आणि क्रिती सनॉन ७ जून रोजी तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात एकत्र दिसले होते, ज्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्याचवेळी, एका व्हिडिओमध्ये ओम राऊत मंदिराबाहेर क्रितीला निरोप देताना दिसला, ज्यामुळे तो वादात सापडला. या व्हिडिओमुळे ओम राऊत यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये 'आदिपुरुष'ची टीम मंदिराबाहेर उभी असलेली दिसत आहे. जेव्हा क्रिती तिथून निघून तिच्या कारकडे जाऊ लागली, तेव्हा ती अचानक निरोप घेण्यासाठी सर्वांकडे जाते. दरम्यान, ओम राऊतने क्रितीला मिठी मारली आणि तिच्या गालावर चुंबन घेतले. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून ओम राऊतला ट्रोल केले जात आहे. मंदिराजवळ असे केल्याने धार्मिक श्रद्धा आणि भावना दुखावल्या गेल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे भाजपचे राज्य सचिव रमेश नायडू यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, या पवित्र ठिकाणी अशी वर्तणूक करणे गरजेचे आहे का? तिरुमालामध्ये देव वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या समोर किस करणे, गळाभेट करणे अशा गोष्टी अपमानजनक आहे. हे सहन केले जाणार नाही. नंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केले.