लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:41 PM2024-10-10T12:41:40+5:302024-10-10T12:42:08+5:30
दिलजीत दोसांजला लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच त्याने केलेल्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतंय (diljit dosanjh)
भारताचे महान उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. रतन टाटांच्या निधनाने भारतातील नव्हे तर जगभरातील नागरिक शोकाकुल झाले आहेत. अनेकजण रतन टाटांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन शोक व्यक्त करत आहेत. सामान्य माणसापासून लोकप्रिय सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योगपती असे प्रत्येकजण रतन टाटांना आदरांजली वाहत आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेता-गायक दिलजीत दोसांजला लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच त्याने केलेल्या छोट्या कृतीचं मोठं कौतुक होतंय.
दिलजीतने लाईव्ह शोमध्ये केली ही कृती
सध्या दिलजीत जगभरात त्याच्या शोचे लाईव्ह कॉन्सर्ट करत आहे. नुकताच दिलजीत युनायटेड किंग्डममधून (UK) रवाना होऊन काल रात्री जर्मनीमध्ये लाईव्ह शो करत होता. अशातच त्याला रतन टाटांच्या निधनाची बातमी कळाली. ही दुःखद वार्ता ऐकताच दिलजीतने लाईव्ह शो मध्येच थांबवला. दिलजीतने शो थांबवून उद्योगपती रतन टाटांना श्रद्धांजली वाहून त्याच्या भावना व्यक्त केल्या. दिलजीतने केलेल्या या छोट्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतंय.
दिलजीत रतन टाटांविषयी काय म्हणाला?
दिलजीत लाईव्ह शो मध्येच थांबवून म्हणाला की, "आपले प्रिय रतन टाटा यांचं निधन झालंय. हेच आयुष्य आहे. ज्या पद्धतीने रतन टाटांनी त्यांचं आयुष्य जगलंय त्याची प्रशंसा केली पाहिजे. मेहनत करुन शांतपणे लक्ष्य साध्य करा, ही शिकवण रतन टाटांनी आपल्याला दिली. कधीही कोणासाठी त्यांनी वाईट शब्द वापरले नाहीत. कायमच चांगलं काम केलं. आजचा हा शो त्यांना समर्पित करुन नमन करतो." अशा भावना दिलजीतने व्यक्त करुन रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली.