Naatu Naatu :कारमध्ये सुचलेले शब्द, १९ महिन्यांची मेहनत ते ऑस्कर; 'नाटू नाटू'चा भन्नाट प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 09:12 AM2023-03-13T09:12:08+5:302023-03-13T09:32:20+5:30
'नाटू नाटू' गाण्याचा ऑस्करपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिण्यासाठी तब्बल १९ महिने लागले.
एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्यानं ऑस्करवर आपलं नाव कोरलं आहे. 'नाटू नाटू या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे. 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्सचा पुरस्कार मिळाला आहे. 'नाटू नाटू' गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ऑस्करमध्ये आज ही परफॉर्मदेखील करण्यात आलं. याआधी या गाण्यानं गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील पटकावला होता. पण नाटू नाटू या गाण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. ‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिणारे तेलगूचे सुप्रसिद्ध गीतकार व गायक चंद्रबोस (Naatu Naatu Lyricist Chandrabose) यांनी एका मुलाखतीत या गाण्याचा प्रवास उलगडला.
‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिण्यासाठी त्यांना १९ महिने लागलेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रबोस यांनी ‘नाटू नाटू’ या गाण्याच्या जन्माबद्दल सांगितलं. ते म्हणाले, ‘नाटू नाटू’ हे ९० टक्के गाणं मी अर्ध्या दिवसात लिहून पूर्ण केलं. पण उर्वरित १० टक्के गाणं लिहायला मला १९ महिने लागले. आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजमौलींनी मला एका विशिष्ट सीनसाठी एक खास गाणं लिहायला सांगितलं. मी तीन गाणी लिहिली आणि त्यांना दाखवलीत. यापैकी ‘नाटू नाटू’ त्यांना आवडलं. ‘नाटू नाटू’ ही हूक लाईन मला कारमध्ये सुचली होती. मी लगेच माझ्या सेलफोनमध्ये त्या तीन ओळी रेकॉर्ड करून घेतल्या. यानंतर घरी आल्यावर मी त्यावर आणखी काम केलं.
चंद्रबोस यांचं पूर्ण नाव कनुकुंतला सुभाष चंद्रबोस आहे. १९९५ मध्ये आलेल्या ताजमहल या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. २७ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ८५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी ३५०० गाणी लिहिली. गीतकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.