५० बंगल्यांचं मालक, ४० दिवस उपाशी राहून घटवलं वजन, ३४ व्या वर्षी गूढ मृत्यू.. इंटरेस्टिंग आहे या साऊथ स्टारची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:07 PM2023-01-07T12:07:19+5:302023-01-07T12:07:41+5:30
ते पहिले असे अभिनेते होते ज्यांनी आपली कमाई रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली होती.
पी. यु. चिनप्पा तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते, ज्यांच्यापासून फिल्म स्टार्सची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. चिनप्पा हे गायक होते, कुस्तीपटू होते, इतकेच नाही तर तलवारबाजीही जाणत होते. ते जेव्हा गात असत तेव्हा स्टेजवर नोटांचा पाऊस पडत असे. कुस्तीमुळे शरीर जड झाले आणि नायकाच्या भूमिका मिळण्यात अडचणी होऊ लागल्या, तेव्हा चिनप्पा यांनी सलग ४० दिवस उपाशी राहून वजन कमी केले आणि त्यानंतर त्याने सलग हिट चित्रपट दिले.
चिनप्पा हे पहिले अभिनेता होते ज्यांनी आपली कमाई रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या मूळ गावी पुदुकोट्टई (तामिळनाडू) येथे ३० घरे खरेदी केली. त्या ठिकाणच्या राजाला हे कळल्यावर त्यांना घर घेण्यास बंदी घालण्यात आली. चिनप्पा यांनी चेन्नईमध्ये २० घरेही खरेदी केली आहेत. एकेकाळी ते ५० बंगल्यांचे मालक होते. सर्व जमलेले भांडवल त्यांनी मालमत्तेत गुंतवले. एके दिवशी वयाच्या ३४ व्या वर्षी अचानक त्यांच्या तोंडातून रक्त आले आणि काही मिनिटांतच त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे खरे कारण काय हे आजही कळू शकले नाही.
चिनप्पा यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची झाली दयनीय अवस्था
चिनप्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था वाईट झाली होती. ते एक एक रुपयांसाठी तरसत होते. पी.यू. चिनप्पा १९४० च्या दशकातील सुपरस्टार होते, परंतु आजही तामिळनाडूसह दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये त्यांच्या चित्रपटांच्या डीव्हीडींना सर्वाधिक मागणी आहे आणि आजही चॅनेलवर त्यांचे कृष्णधवल चित्रपट दाखवले जातात. ते पहिले अभिनेते होते ज्यांच्या एका चित्रपटाची १ कोटी तिकिटे विकली गेली होती.