‘पाताललोक’ वादाच्या भोव-यात; लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्माला मिळाली कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:25 AM2020-05-21T10:25:12+5:302020-05-21T10:26:32+5:30
‘पाताललोक’ ही अनुष्काची पहिलीच वेबसीरिज. आता त्यावरून वाद उफाळून आला आहे. काय आहे हा वाद?
लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे सगळे काम ठप्प आहे, पण हो लॉकडाऊनच्या या काळातही अभिनेत्री अनुष्का शर्मा मात्र जाम चर्चेत आहे. अनुष्काची ‘पाताललोक’ ही वेबसीरिज रिलीज झाली आणि अनुष्का चर्चेत आली. अनुष्काची निर्मिती असलेली ही वेबसीरिज आधी लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. पण नंतर ती एका वादातही सापडली. होय, सोशल मीडियावर या वेबसीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असताना आता लॉयर्स गिल्डचे सदस्य वीरेन सिंग गुरुंग यांनी या सीरिजसंदर्भात अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी या नोटीसमध्ये केला आहे.
18 मे रोजी पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी ही वेबसीरिज नेपाळी समुदायाचा अपमान करणारी असल्याचा दावाही केला आहे. वीरेन यांनी सांगितले, वेबसीरिजच्या एका एपिसोडमध्ये 3 मिनिटं आणि 41 सेकंदांच्या एका दृश्यात एक महिला पोलिस नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते. वेबसीरिजमध्ये नेपाळी शब्द वापरल्याबद्दल आम्हाला कोणतीही समस्या नाही. पण त्यानंतर जो शब्द वापरला गेला आहे त्याला त्यांचा विरोध आहे. नेपाळी भाषा ही 22 अनुसूचित भाषांपैकी एक आहे. भारतात दीड कोटी लोक नेपाळी भाषा बोलतात. भारतात गोरखा समुदाय सर्वाधिक नेपाळी भाषा बोलणारा समुदाय आहे आणि या वेब सीरिजमध्ये वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांचा अपमान झाला आहे. यासाठी अनुष्काने माफी मागायला हवी.’
वीरेन यांनी यासंदर्भात एक आॅनलाइन पीटिशनही केली आहे. रचनात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली वंशवादी हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी यात म्हटले आहे. यासंदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Appeal to all the General Public!
— Bharatiya Gorkha Yuva Parisangh (@BhaGoYuP) May 20, 2020
Please sign our petition and share:https://t.co/ErtxCr1r8v#NEStereotyped#StopRacism#Patallolpic.twitter.com/kR9YKwQ1al
बहिष्कार टाका
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. दोन वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजला विरोध होत आहे. एका गटाच्या मते, यातील अनेक दृश्ये हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत. यात सीबीआय, सरकार, पोलिस आणि सरसकट सर्व हिंदूंना वाईट ठरवले आहे. तर दुस-या एका गटाच्या मते, ही सीरिज इस्लामविरोधी आहे. इस्लामच्या धर्मग्रंथांना अतिरेकी साहित्याच्या रूपात दाखवण्याचा आरोप या गटाने केला आहे.
‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
काय आहे कथा
ही वेबसीरिज हाथीराम चौधरी या एका पोलिस अधिका-याची कथा आहे. ही कथा आहे दिल्लीची. जिथे यमुनाच्या पूलावर चार आरोपींना पकडले जाते. यांच्यावर एका टॉपचा पत्रकार व न्यूज अँकर संजीव मेहरा (नीरज काबी)च्या मर्डरचा कट रचल्याचा आरोप असतो. हे प्रकरण पोलीस हाथी राम चौधरी (जयदीप अल्हावत)ला दिले जाते. हाथी राम यमुना पार केल्यावर असलेल्या पोलीस ठाण्यात काम करणारा साधारण पोलीस असतो. पण या एका प्रकरणाच्या निमित्ताने हाथीरामला आता स्वत:ला सिद्ध करायचे असते. मी हिरो आहे, हे पोलिस डिपार्टमेंटलाच नाही तर स्वत:च्या कुटुंबालाही त्याला दाखवून द्यायचे असते. तो यात यशस्वी होतो की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसीरिज बघावी लागेल.