‘पुष्पा म्हणजे बकवास सिनेमा...’; अल्लू अर्जुनच्या सिनेमावर भडकले पद्मश्री गरिकापति नरसिम्हा राव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:45 AM2022-02-04T11:45:12+5:302022-02-04T11:52:23+5:30
Pushpa : एकीकडे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाचं जगभर कौतुक होतंय. दुसरीकडे पद्मश्री पुरस्कार विजेते गरिकापति नरसिम्हा राव यांनी अल्लूच्या या सिनेमाला ‘बकवास’ म्हणत त्यावर जोरदार टीका केली आहे.
एकीकडे अल्लू अर्जुन (Allu Arjun) व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa: The Rise) या सिनेमाचं जगभर कौतुक होतंय. अल्लू अर्जुनचं अख्ख्या सिनेमाभर ते एक खांदा उंच करून चालणं, ‘श्रीवल्ली’ गाण्यावर त्याने पाय घसरत घसरत केलेला डान्स, दाढीवरून हात फिरवत केलेली डायलॉगबाजी सगळ्यांवर चाहते फिदा आहेत. पण दुसरीकडे पद्मश्री पुरस्कार विजेते तेलगू साहित्यिक कलाकार गरिकापति नरसिम्हा राव (Garikapati Narasimha rao) यांनी अल्लूच्या या सिनेमाला ‘बकवास’ म्हणत त्यावर जोरदार टीका केली आहे. या चित्रपटावर आणि तो बनवणाऱ्या मेकर्सवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गरिकापति नरसिम्हा राव यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतोय. यांनी पुष्पा व याच्या मेकर्सवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
పుష్ప రాజ్ ని తీవ్రంగా ఖండిస్తున్నాను.. pic.twitter.com/ZAor5un2Wc
— . (@IamKKRao) February 2, 2022
काय म्हणाले गरिकापति नरसिम्हा राव?
पुष्पा या सिनेमाला काहीही अर्थ नाही. एक धोकादायक आदर्श समाजासमोर ठेवणारा हा सिनेमा निरर्थक आहे. हा सिनेमा एका तस्कराचं गुणगान करतो, त्याला हिरो म्हणून सादर करतो आणि लोक त्याला ‘मास हिरो’ म्हणतो. मला भविष्यात या चित्रपटाच्या हिरोला वा दिग्दर्शकाला भेटण्याची संधी मिळाली तर, मी याबद्दल त्यांना जरूर जाब विचारणार आहे. एका तस्कराला हिरो दाखवून हा सिनेमाला काय संदेश देतो? उद्या हिरोसारख्या एखाद्याने रत्यावर एखाद्या निष्पाप व्यक्तिला मारलं तर याची जबाबदारी कोण घेणार? हाच नाही तर असे अनेक सिनेमे एंटरटेनमेंटच्या नावावर बकवास गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत. अशा सिनेमातील संवादांमुळे समाजातील गुन्हेगारी वाढतेय. पण त्याची कोणाला चिंता आहे? अशा शब्दांत गरिकापति नरसिम्हा राव यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पुष्पा हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेलगू भाषेतील हा सिनेमा हिंदीसह अन्य भाषांमध्ये रिलीज झाला. सुकुमार दिग्दर्शित या सिनेमात अल्लू अर्जुनने रक्तचंदनाच्या तस्कराची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.