‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:25 AM2019-01-23T10:25:07+5:302019-01-23T10:27:48+5:30
गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. पण ‘रंगीला राजा’चे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या.
गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्यानंतर अनेक ठिकाणचे या चित्रपटाचे शो रद्द करावे लागले. पण ‘रंगीला राजा’चे दिग्दर्शक - निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या. हा चित्रपट जाणीवपूर्वक आवश्यक तितक्या स्क्रिन्सवर रिलीज होऊ दिला नाही. ‘रंगीला राजा’ रिलीज झाला आणि निहलानी उखडले. इतके की, इंडस्ट्रीत अनेक ग्लॅमरस माफिया आहेत आणि हेच लोक मनोरंजन उद्योग चालवत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आधी सेन्सॉर बोर्डाच्या असताना माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे मला लक्ष्य केले गेले. आता माझ्यामुळे गोविंदालाही लक्ष्य केले जात आहे. गोविंदा व माझे या इंडस्ट्रीत सर्वाधिक शत्रू आहेत. पाटणा आणि रांचीत गोविंदाचे सर्वाधिक चाहते आहेत. पण येथील एकही चित्रपटगृह ‘रंगीला राजा’ प्रदर्शित करायला तयार नव्हते. का? काय माझा चित्रपट खराब आहे? काय केवळ चांगले चित्रपटचं चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ शकतात? माझा चित्रपट खराब आहे हे कुणी ठरवले? असे सवाल पहलाज यांनी केले.
मुठभर समीक्षकांसाठी मी प्रेस शो ठेवला नाही, म्हणून ते बिथरले. त्यांनी याचा बदला माझ्या चित्रपटाचा अपप्रचार करून घेतला. हे लोक कोण,हे मला ठाऊक आहे. मला आणि गोविंदाला ते संपवू इच्छितात. आज अख्खी मनोरंजनसृष्टी ग्लॅमरस माफियांद्वारे चालवली जाते. ते एकाठिकाणी बसतात, ऊठतात, चित्रपट बनवतात. माझ्या सारख्या निर्मात्यांच्या ज्यांच्या शिरावर कुण्याही कार्पोरेटचा हात नाही, त्यांना इंडस्ट्रीतून बाहेर फेकण्याचा कट रचला जात आहे. पण मी या सगळ्यांना घाबरून कुठेही जाणारा नाही. कारण मी या सगळ्यांपेक्षा अधिक काळ या चित्रपटसृष्टीला दिला आहे. मी गोविंदासाठी आणखी एक चित्रपट बनवणार आणि तो ए-लिस्ट स्टार आहे, हे सिद्ध करणार, असे ते म्हणाले.