'हाऊसफुल 4'चे दिग्दर्शन करणार 'ही' जोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 01:23 PM2018-10-15T13:23:00+5:302018-10-15T13:23:54+5:30
'हाऊसफुल 4' सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद-फरहाद या जोडीने स्वीकारली आहे.
दिग्दर्शक साजिद खानवर चार तरूणींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केले आहेत. या आरोपाचे पडसाद त्याच्या 'हाऊसफुल- 4' या चित्रपटावर पाहायला मिळाले. अक्षय कुमारने या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याची मागणी केल्यानंतर साजिदने या चित्रपटाच्या दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या चित्रपटाचे पुढे काय होणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता सूत्रांच्या माहितीनुसार 'हाऊसफुल 4' सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद-फरहाद या जोडीने स्वीकारली आहे.
साजिद-फरहाद या जोडीने आतापर्यंत 'बोल बच्चन', 'गॉड तुस्सी ग्रेट हो' आणि 'हाऊसफुल 3' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता 'हाऊसफुल 4'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील ते सांभाळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
'हाऊसफुल- 4'चे नुकतेच राजस्थान येथील चित्रीकरण पुर्ण झाले होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. अक्षय कुमारने साजिदबरोबर काम न करण्याची भूमिका घेतल्याने साजिद नाडियादवालाने 'हाऊसफुल 4'चे शुटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता साजिद -फरहाद ही जोडी दिग्दर्शन करणार असून लवकरच या सिनेमाच्या उर्वरित शूटिंगला सुरूवात होईल.
अभिनेत्री सलोनी चोप्राने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. तिने २०११ साली साजिद खानकडे मुलाखत देण्यासाठी गेली असतानाचा अनुभव यावेळी उघड केला. साजिद खानने यावेळी तुझ्यावर कधी लैंगिक अत्याचार झालेत का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्याचे तिने सांगितले. यासोबतच साजिद आपल्याला लैंगिक संबंधांबद्दल सांगू लागला असेही तिने म्हटले. साजिद मला वारंवार कॉल करत असे, तो कामाचे कधीही बोलत नसे. मी कोणते कपडे घातले आहेत असे प्रश्न तो मला विचारायचा. अनेकदा त्याने मला बिकिनीमधील फोटो पाठवण्यासाठी सांगितले होते, असेही सलोनीने सांगितले. इतर 3 महिलांनीही साजिदवर अशाच प्रकारचे आरोप केले होते.