या अभिनेत्रीला मुलाने सोडले होते वृद्धाश्रमात, त्याची वाट पाहातच घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:01+5:30
या अभिनेत्रीच्या मुलाने रुग्णालयात त्यांना दाखल केले होते आणि तिथून पळ काढला होता.
पाकिजा हा चित्रपट सत्तरीच्या दशकात चांगलाच गाजला होता. या चित्रपटात राजकुमार, मीना कुमारी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील आपके ये हसीन पैर जमीन पे मत रखिये, मैले हो जायेगे हा संवाद चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील राजकुमार आणि मीना कुमारी यांच्यासोबतच राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली होती. ही अभिनेत्री गीता कपूर या होत्या. गीता यांनी त्यांच्या करियरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांचे शेवटची काही वर्षं ही खूपच हलाखीत गेली.
गीता कपूर यांना त्यांच्या मुलाने रुग्णालयात दाखल केले होते आणि तिथून त्याने पळ काढला होता. अतिशय वाईट अवस्थेत त्यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयात सोडून दिले होते. गीता कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा मुलगा त्यांना प्रचंड मारहाण करायचा. एवढेच नव्हे तर त्यांना चार दिवसांतून एकदा खायला दिले जायचे. त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पैसे घेऊन मी लगेचच येतो असे सांगत त्यांचा मुलगा निघून गेला होता. पण तो परत कधीच आला नाही. वर्तमानपत्रात ही बातमी आल्यानंतर निर्माते अशोक पंडित यांनी त्यांचे रुग्णालयाचे बिल भरले होते आणि त्यांना एका वृद्धाश्रमात दाखल केले होते. गीता कपूर यांच्या मुलाचे नाव राजा असून तो बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करतो. माझा मुलगा राजा मला परत घेऊन जाईन अशी आशा त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत होती. माझा मुलगा येईल असे त्यांनी एका मुलाखतीत देखील सांगितले होते. पण त्यांचा मुलगा काही त्यांना भेटायला आला नाही. वृद्धाश्रमात असताना त्यांचे निधन झाले.
गीता यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील त्यांचा मुलगा आला नव्हता. त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मुलीने आणि बहिणीने केले होते.