'एक सच्चा पाकिस्तानी असल्याने..'; Chandrayaan 3च्या यशावर पाकिस्तानी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:35 AM2023-08-25T11:35:39+5:302023-08-25T11:36:40+5:30
Farhan Saeed: एका पाकिस्तानी अभिनेत्याने भारताचं कौतुक करत स्वत:च्या देशाची एक काळी बाजू समोर आणली आहे.
२३ ऑगस्ट २०२३ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या दिवशी 'चांद्रयान-3'च्या (Chandrayaan 3) विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रवावर अलगदपणे लँडिंग केलं. संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी हे लँडिंग झालं आणि भारताने इतिहास रचला. चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा भारत चौथा देश ठरला आहे. इतकंच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिल्याच देश ठरला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरातून भारताचं कौतुक केलं जात आहे. यामध्येच एका पाकिस्तानी अभिनेत्याने भारताचं कौतुक करत स्वत:च्या देशाची एक काळी बाजू समोर आणली आहे.
भारताने Chandrayaan 3 ही मोहीम यशस्वी केल्यामुळे अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. यामध्येच पाकिस्तानी अभिनेता फरहान सईद (Farhan Saeed) याचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. या अभिनेत्याने भारताचं अभिनंदन करत पाकिस्तानविषयी खंत व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाला फरहान सईद?
"भारत स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षी चंद्रावर पोहोचला. पण, पाकिस्तानचं भवितव्य आणि देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने जातीये? हा विचार करुन त्रस्त व्हायला होतं. पाकिस्तानला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर आम्हाला बोलण्याची परवानगी नाही. पाकिस्तानमध्ये आम्हाला फक्त युद्ध आणि षड्यंत्रांसाठीच प्रोत्साहन दिलं जातं", असं फरहान सईद म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "एक सच्चा पाकिस्तानी असल्याच्या नात्याने मी एक गोष्ट सांगतो, आम्ही जे काही करतोय ते योग्य नाहीये. "
दरम्यान, फरहान सईदचं हे वक्तव्य ऐकल्यावर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी त्याला सहमती दर्शवत पाठिंबा दिला आहे. इतकचं नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री सहर शनिवारी हिनेदेखील तिची खंत व्यक्त केली आहे. ‘आज खरच आमची मान शरमेने झुकत आहे', असं ती म्हणाली.