कधीकाळी अमिताभ-वरूणसोबत जायचा दिवस, आता सुचिस्मितावर मोमोज विकण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:56 PM2021-03-26T14:56:09+5:302021-03-26T15:00:22+5:30
कोरोना व्हायरसने केवळ अनेकांना आयुष्यातून उठवले नाही तर अनेकांची स्वप्नंही हिरावून घेतली.
कोरोना व्हायरसने केवळ अनेकांना आयुष्यातून उठवले नाही तर अनेकांची स्वप्नंही हिरावून घेतली. काम-धंदे बुडाले आणि डोळ्यातील स्वप्नं डोळ्यात विरली. बॉलिवूड इंडस्ट्रीतील झगमगाटाची सवय झालेल्यांच्या वाट्यालाही अंधार आला. होय, सुचिस्मिता राउतराय हिची कथा अशीच. एक ध्यास, एक स्वप्नं घेऊन मुंबईत आलेल्या सुचिस्मितावर कोरोनामुळे मोमोज विकण्याची वेळ आली आहे.
सुचिस्मिता कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एक गुणी आणि मेहनती फिमेल कॅमेरापर्सन. अमिताभ बच्चन, आलिया भट, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, वरूण धवन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत काम करणारी सुचिस्मिता आता कॅमेरा सोडून दिवसभर मोमोज विकते. दिवसभर मोमोज विकून तिला दिवसाकाठी 300-400 रूपये मिळतात.
कॅमेरा पर्सन बनण्याचे स्वप्न घेऊन सुचिस्मिता ओडिशावरून मुंबईत आली होती. कॉलेज पूर्ण केल्यानंतर तिने ओडिशा साइन इंडस्ट्रीत काम केले आणि 2015 साली मुंबईत आली. बॉलिवूडमध्ये ओळख वाढली आणि हळूहळू कामही मिळू लागले. ती अस्टिस्टंट कॅमेरा पर्सन बनली. 6 वर्षांत सुचिस्मिताने अथक कष्ट घेतले आणि नाव कमावले. पण कोरोना आला, लॉकडाऊनची घोषणा झाली, पाठोपाठ इंडस्ट्री ठप्प झाली आणि सोबत सुचिस्मिताला काम मिळणे बंद झाले. आर्थिक स्थिती खालावली. ओडिशातील घरी परण्याएवढे पैसेही गाठी उरले नाहीत.
अमिताभ व सलमान खान यांनी ज्युनिअर आर्टिस्टला मदत केली. सुचिस्मिताला काही पैसे मिळाले. या पैशातून तिने घर जवळ केले. सुचिस्मिताच्या वडिलांचे निधन झाले आहे. आईची जबाबदारी तिच्यावर आहे. एकटी कमावणारी असल्याने पैशांसाठी सुचिस्मिताने मोमोज विकणे सुरु केले.
मधल्या काळात सुचिस्मिताने पुन्हा इंडस्ट्रीत परतण्याचे प्रयत्न करून पाहिले. पण तिला यश मिळाले नाही.