Pankaj Thripathi : 'एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो, आता दिग्दर्शकांची रांग लागतेय'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:14 PM2021-07-28T19:14:02+5:302021-07-28T19:14:31+5:30
Pankaj Thripathi : पंकज यांनी दिल्लीतील एनएसडी अॅक्टीस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईचा रस्ता पकडला होता. मायनगरी असलेल्या मुंबईत आपलं नशिब आजमवण्यासाठी हजारो, लाखो जण येतात.
मुंबई - आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या पंकज त्रिपाठी यांनी सुरुवातीच्या काळातील संघर्ष मीडियाशी बोलताना व्यक्त केला. यापूर्वीही काही शोमध्ये आणि मुलाखतीमध्ये त्यांनी नाट्य व अभिनय क्षेत्रातील सुरुवातीचा काळ चाहत्यांसाठी सांगितला होता. अतिशय खडतर प्रवास करुन त्यांनी दिग्गज, दर्जेदार अभिनेता अशी ओळख निर्माण केली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर ते अनेक नावाजलेल्या वेब सिरीजमधून पंकज यांनी स्वत:ला सिद्ध करत, प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
पंकज यांनी दिल्लीतील एनएसडी अॅक्टीस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईचा रस्ता पकडला होता. मायनगरी असलेल्या मुंबईत आपलं नशिब आजमवण्यासाठी हजारो, लाखो जण येतात. त्यापैकी, संयम आणि सातत्य बाळगणाराच येथे टिकतो, मुंबई जिंकतो. पंकज त्रिपाठी हे यापैकीच एक आहेत. मुंबईत आल्यानंतर पत्नी मृदुला याही त्यांच्यासमेवत होत्या. त्यामुळे, पंकज यांना काम शोधावे लागायचे, तर पत्नी उर्मिला यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. एक काळ असा होता मुंबईतील अंधेरीत काम मागण्यासाठी सातत्याने चकरा मारायचो, या स्टुडिओतून त्या स्टुडिओत भटकायचो. मात्र, आता पार्कींगमध्ये मला चित्रपटांची ऑफऱ येत आहे, असे पंकज यांनी सांगितले.
मुंबईतील संघर्षांच्या सुरुवातीच्या काळात पत्नी उर्मिलानेच 6 वर्षे कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही पेलली. कारण, 6 वर्षांपर्यंत मी काहीच कमावू शकलो नाही. सन 2004 ते 2010 या कालवधीत मला नीटनीटके पैसेही मिळत नसत, असेही पंकज यांनी एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच, सध्या मिळत असलेल्या ऑफरबद्दलही त्यांनी सांगितलं. सध्या अनेक दिग्दर्शकांनी पार्कींगमध्येच मला गाठून चित्रपटात काम करण्याच्या ऑफर्स दिल्या आहेत. निदान स्टोरी तरी ऐकून घ्या, असेही काहीजण म्हणतात.