'फुकरे' च्या पोस्टरमध्ये VFX चा वाघ पण मला जागा नाही, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 02:17 PM2023-10-23T14:17:29+5:302023-10-23T14:18:13+5:30
लक्ष्य मध्ये काम केल्यावर माझे सीनच कापले, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केलं दु:ख
बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी प्रत्येकाच्याच मनात घर करुन घेतलंय. हृतिक रोशनचा गाजलेला लक्ष्य सिनेमात पंकज त्रिपाठींनीही काम केलं होतं. मात्र फायनल एडिटमध्ये त्यांचे अनेक सीन्स कट केले गेले. नुकतंच पंकज त्रिपाठींनी ही आठवण सांगताना नाराजी व्यक्त केली. शिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या 'फुकरे 2'च्या पोस्टरवर व्हीएफएक्सने बनवलेल्या टायगरला जागा दिली पण मला नाही यावरही त्यांनी भाष्य केले.
लल्लंनटॉपला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले, "मी लक्ष्य सिनेमात काम केल्याचं एकदा पेपरमध्ये छापून आलं होतं. मला वाईट वाटलं कारण ज्यांनी पेपरमध्ये हे वाचलं असेल त्यांना नंतर मी सिनेमात दिसलोच नाही. लोकांना वाटलं असेल की मी खोटं बोलत आहे. सिनेमा हे खोटंच असतं. आम्ही स्टोरी बनवतो आणि स्क्रीनवर दाखवतो पण मी खऱ्या आयुष्यात खोट्यापासून वाचतो. पेपरमध्ये तर आलं बिहार का लाल झळकणार पण सिनेमात तो दिसलाच नाही. एकदा एका फिल्म डिस्ट्रिब्युटरने मला सक्सेसफुल चेहरा होशील असे सांगितले होते."
ते पुढे म्हणाले, "मला कधीच लाँच केलं गेलं नाही. ना माझा कोणी गॉडफादर आहे ना कोणी दुश्मन. फुकरे २ च्या पोस्टरवर ते मुख्य कलाकारांसोबत व्हीएफएक्सवाला वाघ लावतात. मी त्यांना म्हणलं, हा जो व्हीएफएक्स टायगर आहे त्याला करिअर बनवायचं नाहीए, मला बनवायचंय. त्याच्याऐवजी माझा फोटो लावायला हवा होता. मात्र हा एक प्रवास आहे, ज्यामध्ये वेळेची महत्वपूर्ण भूमिका आहे."
पंकज त्रिपाठी यांचे नुकतेच 'फुकरे 3' आणि 'ओएमजी 2' हे चित्रपट रिलीज झाले. दोन्ही सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.