Pankaj Tripathi : अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केली? पंकज त्रिपाठी म्हणाले, "मी ६० दिवस फक्त..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 03:14 PM2023-11-04T15:14:21+5:302023-11-04T15:14:52+5:30
पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी 'मैं अटल हूं' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाचा अनुभव सांगितला.
पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिकांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप पाडली. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी 'मैं अटल हूं' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाचा अनुभव सांगितला.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकसाठी पंकज त्रिपाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केला, याचा खुलासा पंकज त्रिपाठी यांनी 'फिल्म कंपेनियन'ला दिलेल्या मुलाखतीत केला. या भूमिकेसाठी स्ट्रिक्ट डाएट केल्याचं त्रिपाठींनी सांगितलं. शूटिंगचे ६० दिवस त्रिपाठी केवळ खिचडी खायचे. ते म्हणाले, "मी शूटिंगच्या दिवसांत फक्त खिचडी खात होतो. मै अटल हूं चित्रपटाचं शूटिंग ६० दिवस सुरू होतं. या ६० दिवसांत मी फक्त खिचडी खाल्ली. ती खिचडीदेखील मीच बनवायचो. इतर लोक तुमच्यासाठी जेवण कसे बनवतात, हे तुम्हाला कळू शकत नाही. मी तेल आणि मसाले न वापरता केवळ तांदूळ, डाळ आणि भाज्या वापरुन खिचडी बनवायचो."
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खिचडी खाण्याचं कारणही सांगितलं. अटलजींची भूमिका उत्तमरित्या साकारता यावी आणि भावनिक दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचं त्रिपाठी म्हणाले. "जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा मी समोसा खाऊनही अभिनय करू शकत होतो. पण, आता मला शेवटचा समोसा कधी खाल्ला होता,हेदेखील आठवत नाही. आता मला सात्विक आहाराची गरज आहे," असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, त्रिपाठी मुख्य भूमिकेत असलेला 'मै अटल हूं' हा चित्रपट येत्या २५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.