एकेकाळी या अभिनेत्याने पावसात छप्परविना काढले होते दिवस, आज मुंबईत घेतले आलिशान घर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:13 PM2019-04-15T13:13:24+5:302019-04-15T13:18:11+5:30
अपयश आल्याने या अभिनेत्याने अभिनय सोडून दिले आणि काही वर्षं हॉटेलमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो कामाच्या शोधात मुंबईत आला.
पंकज त्रिपाठीचे बालपण बिहारमधील एका छोट्याशा गावात गेले आहे. त्याचे वडील हे शेतकरी असून पंकज देखील शिक्षण सांभाळून त्यांना शेती कामात मदत करत असे. त्याचसोबत लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने तो गावातील नाटकांमध्ये मुलीची भूमिका साकारत असे. त्याची भूमिका लोकांना प्रचंड आवडत होती. त्याचमुळे त्याला गावातील काहीजणांनी चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला आणि त्याने गाव सोडून पटनाला जाण्याचे ठरवले. कॉलेजमध्ये असताना तो नाटकांमध्ये काम करू लागला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत झाला. पण यात अपयश आल्याने त्याने अभिनय आणि राजकारण दोन्ही सोडून दिले आणि काही वर्षं हॉटेलमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो कामाच्या शोधात मुंबईत आला. त्याने रण या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली.
पंकजने रण या चित्रपटानंतर अपहरण, ओमकारा, धर्म यांसारख्या अनेक चित्रपटात छोट्याशा भूमिका साकारल्या. आठ वर्षांनी त्याला गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात एक चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीला एक वळण मिळाले. या चित्रपटासाठी त्याचे ऑडिशन जवळजवळ आठ तास सुरू होते. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांचे तर प्रचंड कौतुक करण्यात आले.
पंकजने आज पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवले आहे. एका छोट्याशा गावात राहाणाऱ्या या मुलाने आता मुंबईत स्वतःचे घर घेतले आहे. पंकजने मुंबईतील मड आयलँडमध्ये घर घेतले असून हे घर घेतल्यामुळे पंकज चांगलाच भावुक झाला आहे. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले की, मी आणि मृदूलाने अनेक वर्षं ज्या घराचे स्वप्न पाहिले होते. त्या घरात आम्ही नुकताच प्रवेश केला आहे. मी माझे मुंबईत घर घेतले असले तरी माझे गावातील घर कधीच विसरू शकत नाही. एकदा इतका जोराचा पाऊस आला होता की, त्या घराचे छप्परच उडून गेले होते आणि विना छप्पर आम्ही रात्र घालवली होती. समुद्र किनारी आपले घर असावे असे मला आणि मृदूलाला नेहमीच वाटायचे. हे घर घेतल्यानंतर आम्ही दोघेही प्रचंड भावुक झालो होतो.