'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:05 PM2024-01-10T12:05:07+5:302024-01-10T12:12:23+5:30
Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी १ आठवडा तुरुंगात कैद होते. त्यानंतर त्यांच्या मनातील 'तो' विचार कायमचा निघून गेला अन् ते अभिनयाकडे वळाले.
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी सध्या त्यांच्या 'मैं अटल हूँ' या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी भारताचे माजी पंतप्रधान अट बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. अलिकडेच त्यांचा या सिनेमाती फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला. तेव्हापासून ते सातत्याने चर्चेत येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एक जुना किस्सा शेअर केला. हा किस्सा सांगत असताना त्यांना अभिनयापेक्षा राजकारणात जास्त रस होता असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर एकदा याच राजकारणाच्या वेडापायी पोलिसांनी त्यांना लाठीचार्जही केला होता.
या मुलाखतीमध्ये पंकज यांना तुम्ही कधी राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी कॉलेजच्या दिवसात घडलेला किस्सा सांगितला. कॉलेजमध्ये असताना पंकज त्रिपाठी एबीव्हीपीचा भाग होते. त्यावेळी अशी एक घटना घडली ज्यामुळे त्यांनी डोक्यातून राजकारणाचा विषय काढून टाकला.
"मी राजकारणात पुढे जाऊ शकेन असं मला वाटत होतं. पण, त्यानंतर मला अटक झाली. आणि, पोलिसांनी मला खूप मारहाण सुद्धा केली. तेव्हापासून मी तो विचार तिथेच सोडून दिला. त्याच काळात माझ्यामध्ये रंगभूमीची आवड निर्माण झाली आणि त्या मार्गावरुन मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला," असं पंकज त्रिपाठी म्हणाले.
दरम्यान, २०१९ मध्ये पंकज यांनी 'PTI' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांना एक आठवडा तुरुंगात काढावा लागला होता असं सांगितलं. पाटणा येथील बेऊर तुरुंगात ते एक आठवडा कैद होते. तुम्हाला तुरुंगात काहीच करायचं नसतं. ना स्वयंपाक, ना मिटिंग,काहीही नाही. तुम्ही पूर्णपणे एकटे असता. ज्यावेळी माणूस अत्यंत एकटा पडतो त्यावेळी तो स्वत:चा शोध घेऊ लागतो. त्या सात दिवसात मला मी सापडलो आणि हिंदी साहित्य वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यात बदल घडत गेला, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.