Birthday Special : परेश रावल यांची पत्नी आहे माजी मिस इंडिया, तरीही राहते लाईमलाईटपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:00 AM2022-05-30T08:00:00+5:302022-05-30T08:00:01+5:30
Paresh Rawal Birthday : अशी आहे परेश रावल यांची लव्हस्टोरी, झाडाखाली घेतल्या होत्या लग्नाच्या आणाभाका...
Paresh Rawal Birthday : फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी पॉलिटिकल आयडियोलॉजी जपणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीतील परेश रावल हे एक ठळक नाव. अभिनय आणि राजकारण याचा पुरता बॅलेन्स साकारून ते अगदी ऐटीत काम करत आहेत. हेराफेरी, ओह माय गॉड यासारखे यादगार सिनेमे देणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचा आज (30 मे) वाढदिवस. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश यांचा जन्म 30 मे 1955 रोजी झाला. 200 पेक्षा अधिक चित्रपट आणि विनोदी ते खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे परेश यांना खरी ओळख मिळाली ती विनोदी भूमिकांमुळे.
अक्षय कुमार व त्यांची जोडी कमालीची गाजली. या जोडीनं जवळपास 23 सिनेमे एकत्र केलेत. पण आज आम्ही तुम्हाला परेश यांच्या सिने करिअरबद्दल नाही तर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणार आहोत. विशेषत: त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल. परेश रावल यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. 1979 साली मिस इंडिया हा खिताब जिंकणाऱ्या स्वरूप संपत (Swaroop Sampat) यांच्याशी त्यांचं लग्न झालं.
तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण स्वरूप या सुद्धा अभिनयक्षेत्राशी संबंधित आहेत. ‘ये जो जिंदगी है’ या विनोदी मालिकेत स्वरूप यांनी काम केलं होतं. यानंतर 1984 मध्ये ‘करिश्मा’ या चित्रपटात त्या दिसल्या. यात त्यांनी कमल हासन आणि रीना रॉय यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. एकेकाळी बिकीनी सीन्स देऊन त्यांनी खळबळ निर्माण केली होती. नरम गरम, हिम्मतवाला, साथिया, सप्तपदी, की अॅण्ड का अशा अनेक चित्रपटांत स्वरूप दिसल्या. कुंकू बनवणा-या श्रृंगार या कंपनीसाठी मॉडेलिंगही केली होती. स्वरूप आता दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात.
स्वरूप यांनी मिस इंडियाचा किताब जिंकला तेव्हा अनेकांना विश्वास बसत नव्हता. कारण त्या अनेक वर्षे गावात एका झोपडीत राहत होत्या. स्वरूप चित्रपटांत काम करताना कधीही आरसा बघत नसत. कॉस्च्युम, लूक याबद्दल त्या कधीही चर्चा करत नसत. हिम्मतवाला या चित्रटानंतर स्वरूप यांनी इंडस्ट्रीतून काहीसं अलिप्त होत समाजसेवेत स्वत:ला झोकून दिलं, ते कायमचंच.
परेश आणि स्वरूप यांची पहिली भेट 1975 साली झाली होती. दोघंही तेव्हा कॉलेजात शिकत. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहताच परेश त्यांच्या प्रेमात पडले होते. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर मी याच मुलीशी लग्न करणार, असं परेश आपल्या एका मित्राला म्हणाले होते. पण यानंतर एक वर्ष परेश व स्वरूप यांच्यात साधं बोलणंही झालं नव्हतं.
एकदा स्वरूप यांनी परेश यांना स्टेज परफॉर्मन्स देताना पाहिलं आणि त्या परेश यांच्या फॅन बनल्या. बॅक स्टेजवर जात त्यांनी तू कोण? असा थेट प्रश्न त्यांनी परेश यांना केला. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. मुंबईच्या लक्ष्मीनारायण मंदिरात दोघांचंही लग्न झालं. मंडपाऐवजी दोघांनीही एका मोठ्या झाडाखाली लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या.