'राजकारणी व्यक्तीशी कधीच लग्न करणार नाही', असं का म्हणाली होती परिणीती? केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:46 PM2024-12-09T16:46:38+5:302024-12-09T16:47:12+5:30
प्रत्यक्षात तिने नेत्याशीच लग्न केलं. तिच्या लग्नानंतर अनेक मीम्स आले. यावर आता नुकतंच परिणीतीने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) 'आम आदमी पार्टी' नेता राघव चड्डाशी (Raghav Chaddha) लग्नगाठ बांधली. मात्र परिणीतीने एका मुलाखतीत 'आयुष्यात कधीच राजकारणातील व्यक्तीशी लग्न करणार नाही' असं वक्तव्य केलं होतं. तर प्रत्यक्षात तिने नेत्याशीच लग्न केलं. तिच्या लग्नानंतर अनेक मीम्स आले. यावर आता नुकतंच परिणीतीने प्रतिक्रिया दिली आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा दोघांनी नुकतीच 'आप की अदालत' मध्ये हजेरी लावली. यावेळी परिणीतीला लग्नावरील त्या वक्तव्याबाबत विचारलं. यावर परिणीती म्हणाली, "हो, हे खरं आहे. मी असं का म्हणाले? माझ्यावर इतके मीम्स कधीच बनले नव्हते. राजकारणी व्यक्तीबद्दल मी आधी वेगळा विचार करायचे. माझ्या मनात त्यांची वेगळी प्रतिमा होती. ते माझ्या वयाचे नसतील असंही मला वाटायचं. माझ्या मनात जी पॉलिटिशियनची इमेज होती ती अशी नव्हती."
ती पुढे म्हणाली, "इंग्लंडमध्ये एका इव्हेंटमध्ये मला आऊटस्टँडिंग एंटरटेनरचा अवॉर्ड मिळाला होता. तर तिथेच राघवला आऊटस्टँडिंग पॉलिटिशयनचा पुरस्कार मिळाला. माझ्या भावाने मला सहजच विचारलं होतं की कोणत्या अवॉर्डसाठी आली आहेस का? कोणाला कोणता पुरस्कार मिळतोय? तेव्हा मी राघवला ओळखतही नव्हते. मी भावाला म्हटलं राघव चड्डा येणार आहे. तेव्हा माझा भाऊ शॉक झाला. तो परत म्हणाला, 'खरंच, राघव येतोय?' मी म्हटलं,'त्यात एवढं ओरडायला काय झालं?' तेव्हा मला कळलं की माझे दोन्ही भाऊ राघव चड्डाचे चाहते आहेत. विशेषत: कोरोनावेळी त्याचं काम पाहून ते त्याचे चाहते झाले."
या अवॉर्डनंतर परिणीती राघव चड्डांना जाऊन भेटली. तिने त्यांना सांगितलं की तिचे दोन्ही भाऊ तुमचे चाहते आहेत. तसंच लवकरच भेटू असंही ती सहजच म्हणाली. तर त्यावर राघवने तिला 'उद्याच भेटू' असं सांगितलं. यानंतर त्यांचा भेटण्याचा सिलसिला सुरु झाला.