Pathaan Movie Mistakes: असं कुठं असतं व्हय? ‘पठाण’ चित्रपटातील या चुका तुमच्या तरी लक्षात आल्या का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 02:27 PM2023-01-30T14:27:56+5:302023-01-30T14:42:17+5:30
Pathaan Movie Mistakes: होय, 'पठाण'च्याअनेक सीन्समध्ये लॉजिक नावाची गोष्टच नाही. अनेक ठिकाणी मेकर्सनी मोठ्या चुका केल्या आहेत.
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला. या चित्रपटात शाहरूख कधी नव्हे इतकी जबरदस्त ॲक्शन करताना दिसतोय. चाहत्यांना त्याचा हा ॲक्शन अवतार जाम आवडला आहे आणि आवडणार का नाही? हॉलिवूडचे टॉप ॲक्शन डायरेक्टर्स Casey O’Neill, Craig Macrae आणि Sunil Rodrigues यांनी ‘पठाण’चे ॲक्शन सीन्स डायरेक्ट केले आहेत. साहजिकच काही सीन्स खिळवून ठेवतात. पण काही सीन्स डोक्याचा नुसता भुगा करतात. होय, अनेक सीन्समध्ये लॉजिक नावाची गोष्टच नाही. अनेक ठिकाणी मेकर्सनी मोठ्या चुका केल्या आहेत.
'पठाण' सिनेमातील एका दृश्यात शाहरुख खान एका दगडावरुन टँकरवर बाईक उडवताना दिसतो. पण दुसऱ्या फ्रेममध्ये हा दगड गायब झालेला दिसतो. त्यामुळे अचानक हा दगड कुठे गायब झाला असा प्रश्न प्रेक्षकांना पडणं स्वाभाविक आहे.
'पठाण' सिनेमातील एका दृश्यात शाहरूख जॉन अब्राहमसोबत (John Abrham) मारामारी करताना दिसत आहे. मारामारी करतानाच्या एका फ्रेममध्ये शाहरुख जॉनपेक्षा मोठा दाखवला आहे. तर दुसऱ्या फ्रेममध्ये जॉन मोठा दाखवला आहे.
शाहरुख-जॉनच्या मारामारी प्रसंगादरम्यान शाहरुखचे केस छोटे आहेत. त्यानंतरच्या दुसऱ्याच प्रसंगात त्याचे लांबलचक केस हवेत उडताना दिसतात.
हेलिकॉप्टरचा तो सीन. यात बसच्या टपावर उभं होऊन शाहरूख व जॉन जबरदस्त ॲक्शन करताना दिसतात. यादरम्यान जॉन दोन हेलिकॉप्टरना दोराच्या मदतीने बसच्या टपावर बांधून ठेवतो. हे पाहून तर हसावं की रडावं तेच कळत नाही.
सलमानच्या एन्ट्रीचा सीन पाहूनही हसावं की रडावं तेच कळत नाही. ट्रेनचं छत फोडून सलमानची एन्ट्री होते. मजेशीर म्हणजे, सलमान वरून खाली उडी घेतो पण त्याच्या हातातील कॉफीचा एक थेंबही खाली सांडत नाही.
आकाशात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम प्लेनसारखे पंख लावून ढगात फायटिंग करताना दिसताता. हा सगळ्यात हास्यास्पद सीन म्हणायला हवा. आकाशात एखाद्या विमानाच्या वेगाने डोळ्यांवर कोणताही सेफ्टी चष्मा नं लावता फायटिंग म्हणजे ग्रेटच...!
चित्रपटात दीपिकाला जेव्हा गोळी लागते, तेव्हा ती तिच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाटून निघते. यानंतर शाहरूख तिच्या जखमेवर पट्टी करतो तेव्हा दीपिकाच्या उजव्या साईडला जखम दिसते. दीपिकाला गोळी कोणत्या बाजूने लागलीये, कदाचित हेच मेकर्स विसरतात.