Pathaan: अमेरिकेतही 'पठान'चा डंका, 'अवतार द वे ऑफ वॉटर'चा रेकॉर्ड ब्रेक करत ठरला अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:24 PM2023-01-28T13:24:50+5:302023-01-28T13:25:23+5:30
Pathaan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shahrukh Khan)चा 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. 'पठाण'ने केवळ भारतातच धुमाकूळ घातला नाही तर अमेरिकेत यशाचा नवा विक्रम नोंदवताना 'अवतार द वे ऑफ वॉटर' सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. हे पाहून शाहरुख खानचे चाहते खूप खूश झाले आहेत. 'अवतार द वे ऑफ वॉटर' सारखे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील चित्रपटगृहांवर राज्य करत होते, ज्याची जागा आता पठाण यांनी घेतली आहे.
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. रिपोर्ट्सनुसार, २५ जानेवारी रोजी चित्रपट उत्तर अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आला, तर अवतार २ ने दुसरा क्रमांक पटकावला. 'पठाण' २५ जानेवारी रोजी जगभरातील ८००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात १०६ कोटींची कमाई केली, हा एक विक्रम आहे. त्याच वेळी, चित्रपटाची भारतात ५५ कोटींची ओपनिंग झाली, जो हिंदी बॉक्स ऑफिसवर एक विक्रम आहे.
शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाने २०२२ मधील सर्वात यशस्वी चित्रपट 'KGF 2' चा ओपनिंग रेकॉर्ड मोडला आणि पहिल्या स्थानावर आपले नाव नोंदवले. 'KGF 2' ने हिंदी बॉक्स ऑफिसवर ५३.९५ कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले. व्यापार तज्ज्ञांच्या मते, 'पठाण सध्या उत्तर अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर धावत आहेत. चित्रपटाने १४ लाख ८८ हजार ९२९ डॉलर कमावले, तर 'अवतार द वे ऑफ वॉटर' १४ लाख ३६ हजार १३० डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख चार वर्षांनंतर 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.