टेलिव्हिजनची ‘क्वीन’ एकता कपूर पुन्हा वादात, अमृतसरमध्ये दाखल झाली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 11:50 AM2020-07-23T11:50:50+5:302020-07-23T11:51:24+5:30
बालाजी हे नाव बदलण्याची मागणी ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
टेलिव्हिजनची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एकता कपूर व तिच्या बालाजी प्रॉडक्शनविरोधात अमृतसरच्या एका न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. केवळ एकताच नाही तर तिचे वडील जितेन्द्र, आई शोभा कपूर यांच्याविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे.
पंजाबचा लोकप्रिय गायक बलजीत सिंग याने ही याचिका दाखल केली आहे. एकताने ‘ट्रिपल एक्स 2’ या वेबसीरिजमध्ये भारतीय सैन्याच्या जवानांचा अपमान केला असल्याचा आरोप त्याने केला आहे. एकता कपूर आपल्या मालिका व वेबसीरिजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अश्लिलता पसरवत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
बालाजी हे नाव बदलावे
बलजीत सिंग याने एकताने तिच्या बालाजी प्रॉडक्शनचे नाव बदलण्याची मागणीही केली आहे. बालाजीचा अर्थ श्री हनुमान असा होतो आणि याच बालाजी नावाच्या बॅनरखाली एकता कपूर अश्लिलता पसरवत आहे. हे समाजविरोधी असल्याचा आरोप बलजीतने केला आहे. हिंदू संघटनांनी एकताविरोधात पुढे येऊन आवाज उठवावा, असे आवाहनही त्याने केले आहे.
हिंदुस्तानी भाऊ दाखल केला होता पहिला गुन्हा
यापूर्वी बिग बॉस 13चा स्पर्धक राहिलेल्या हिंदुस्तानी भाऊने ‘ट्रिपल एक्स 2’मधील सीनवर आक्षेप घेत, एकता व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरला कायदेशीर नोटीस पाठवली होती. एकताच्या संबंधित वेबसीरिजमध्ये इंडियन आर्मीचा अपमान झाला असल्याचा हिंदुस्तानी भाऊचा आरोप होता.
एकताने दिले होते स्पष्टीकरण
या संपूर्ण वादावर एकताने स्पष्टीकरण दिले होते. ‘ एक नागरिक या नात्याने मी भारतीय आमीर्चा पूर्ण सन्मान करते. यात कोणतीही शंका नाही की आपल्या सर्वांच्या सुरक्षेत त्यांचे खूप मोठं योगदान आहे. कोणतीही मान्यता प्राप्त सैन्य संघटना किंवा संस्था आम्हाला माफी मागायला सांगत असेल तर आम्ही माफी मागण्यास तयार तयार आहोत. मात्र असभ्यरित्या सायबर बुलिंग आणि असामाजिक तत्त्वांकडून दिल्या जाणा-या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. वेबसीरिजमधील तो वादग्रस्त सीन काल्पनिक होता. आमची चूक झाली होती आणि आम्ही ती कधी सुधारली आहे. तो सीन कधीच गाळण्यात आला आहे. याप्रकरणी माफी मागणे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. पण याप्रकरणी मला ज्या प्रकारच्या धमक्या मिळत आहेत, त्याला सभ्यपणा म्हणता येणार नाही,’असे तिने म्हटले होते.