'फुलवंती'ने अख्ख्या महाराष्ट्राला पाडलं प्रेमात, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून प्राजक्ता माळी भारावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 05:07 PM2024-10-13T17:07:39+5:302024-10-13T17:08:39+5:30
सर्वत्र 'फुलवंती'ची तुफान चर्चा आहे.
Phulwanti Marathi Movie : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच 'फुलवंती' सिनेमाने महाराष्ट्रात सर्वांनाच वेड लावलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात 'फुलवंती' दररोज मोठी कमाई करत आहे. या सिनेमातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सर्वत्र 'फुलवंती'ची तुफान चर्चा आहे. अशात प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सिनेमांची बुकिंग पाहायला मिळतेय. व्हिडीओसोबत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहलं, "आजपर्यंतचा सर्वोत्तम व्हिडीओ... किती आभार मानू? पुण्यातले जवळजवळ सगळे #shows housefull होताहेत, हे पाहून आनंद गगनात मावत नाहीये.
अभिनेत्री म्हणून आनंद आहेच आणि निर्माती म्हणून खूप हायसं वाटायला लागलंय. सबंध महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होतोय, #कृतज्ञ आहे. असाच #लोभअसावा", य़ा शब्दात तिने आनंद व्यक्त केलाय. याशिवाय प्राजक्ताने #मराठीचित्रपट #मराठीमूलगी #मराठीप्रेक्षक #मराठीसंस्कृती #परंपरा हे हॅशटॅग वापरले आहेत.
याशिवाय प्राजक्ताने आणखी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तिने सिनेमागृहाला अचानक भेट देत प्रेक्षकांना सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतेय. तसेच दसऱ्याच्यादिवशी सिनेमाला मिळेलाला प्रतिसाद पाहून तिने एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले होते.
'फुलवंती'या सिनेमाची निर्माती असण्याबरोबरच प्राजक्ताने मुख्य भूमिकादेखील साकारली आहे. 'फुलवंती'च्या भूमिकेत प्राजक्ता माळी आणि व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील गश्मीर महाजनी आहे. या सिनेमात उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता यांचा सुंदर मिलाफ आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर 'फुलवंती' कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.