कोरोनामुक्त झालेल्या कनिका कपूरला प्लाझ्मा सेल्स दान करण्यास रुग्णालयाने दिला नकार, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:31 PM2020-05-13T18:31:06+5:302020-05-13T18:33:15+5:30
कनिकाचे प्लाझ्मा सेल्स घेण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. रुग्णालयाने असे करण्यामागे एक खास कारण आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर कोरोना मुक्त झाली असून तिने कोरोनाशी सामना करणाऱ्या व्यक्तींच्या प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिचे प्लाझ्मा सेल्स घेण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. रुग्णालयाने असे करण्यामागे एक खास कारण आहे.
ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ब्लड ट्रान्सफ्युजन औषध विभागाच्या अध्यक्षा डॉक्टर तुलीका चंद्रा यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कनिकाच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास पाहाता कनिकाचे प्लाझ्मा सेल्स घेण्यास रुग्णालयाने नकार देण्यात आला आहे. परंतु याबाबत अधिक माहिती त्यांनी मीडियास देण्यास नकार दिला.
कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या लोकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूर खूप चर्चेत आली होती जेव्हा तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आले होते. या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. कारण ती कोरोना पॉझिटिव्ह असतानाही काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. ज्यात काही राजकीय नेतेदेखील सहभागी झाले होते. लखनऊमध्ये कनिका कपूरने उपचार केले आणि आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.