'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 16:19 IST2021-05-25T16:19:10+5:302021-05-25T16:19:56+5:30
अभिनेता सोनू सूदच्या फोटोवर दुग्धाभिषेक केल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन
अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या संकटात अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. अशात त्याचे चाहते आपापल्या पद्धतीने त्याचे आभार मानत आहेत. दरम्यान नुकताच सोनू सूदच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावेळी सोनू सूदने आभार मानले होते. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जिथे लोक सोनू सूदच्या पोस्टरवर दूधाने अभिषेक करत आहेत. हा व्हिडीओ आंध्र प्रदेशमधील कुरनूल आणि निल्लोरचे असल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडीओत सोनू सूदचे चाहते त्याची पूजा करत आहेत आणि त्याच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करताना दिसत आहेत. आता सोनू सूदने यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि दूधाची नासाडी म्हटले आहे. सोनू सूदने व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहिले की, आभार. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे दूध कोणत्यातरी गरजूसाठी वाचवून ठेवा. सोनू सूदच्या या ट्विटवर काही युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याचे कौतुक केले आहे.
Humbled 🙏🙏 https://t.co/aQPOskdHgz
— sonu sood (@SonuSood) May 20, 2021
यापूर्वीही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. तो व्हिडीओ शेअर करत आभार मानले होते. त्यावर काही युजर्सने सोनू सूदवर टीका केली होती. तसेच टेलिव्हिजन अभिनेत्री कविता कौशिकनेदेखील व्हिडीओवर टीका केली होती. एका युजरने सोनू सूदच्या पोस्टरवर दुग्धाभिषेकवर टीका करत म्हटले की हे ठीक आहे सर. मात्र त्यांना असे करू नका असे सांगा. दुधाची नासाडी योग्य नाही. कित्येक लोक भूकेने मरत आहेत.
कविता कौशिकने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, आमच सर्वांचे सोनू सूदवर खूप प्रेम आहे. त्यांच्या चांगल्या कामांमुळे आम्ही नेहमीच त्यांचे आभारी आहोत. मात्र मला आशा आहे की या निराशाजनक कामातून त्यांना कोणताच आनंद होणार नाही. या काळात जेव्हा लोक भुकेने मरत आहेत, दूध वाया घालवले जात आहे. अखेर आपण नेहमीच गोष्टींची अतिशयोक्ती का करतो.