ओटीटी सेन्सॉरशिप : पूजा भटने व्यक्त केला सरकारच्या हेतूवर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 11:21 AM2021-03-07T11:21:10+5:302021-03-07T11:21:23+5:30
गेल्या काही कालावधीपासून ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’चे प्रस्त वाढत चालले आहे. मात्र, त्यावर प्रसारित होणा-या वेबसीरिज संदर्भात अनेक स्तरावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
गेल्या काही कालावधीपासून ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’चे प्रस्त वाढत चालले आहे. मात्र, त्यावर प्रसारित होणा-या वेबसीरिज संदर्भात अनेक स्तरावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटसंदर्भात नियमावली आणणार असल्याचे म्हटले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयानेही एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान ओटीटी दाखवण्यात येणा-या कंटेंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री व दिग्दर्शिका पूजा भट हिने मत व्यक्त केले आहे.
पूजा भट लवकरच नेटफ्लिक्सवरच्या ‘बॉम्बे बेगम्स’ या सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करतेय. यानिमित्ताने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ओटीटी सेन्सॉरशिपच्या मुद्यावर मत मांडले. भारतात नियम-कायदे नवी गोष्ट नाही. फिल्ममेकर्स दीर्घकाळापासून याच्याशी लढत आहेत. एक दिग्दर्शक आपल्या चित्रपट वा सीरिजद्वारे एक संदेश लोकांना देऊ इच्छितो. त्यावरही कायदे-नियम थोपले जातात. आपल्या प्रत्येकाच्या मनात आणि मेंदूत एक सेन्सॉर बोर्ड असते. काय दाखवले पाहिजे, हे हे बोर्ड सांगत असते. माझ्यापुरते सांगायचे झाल्यास, मला योग्य वाटते, ते मी दाखवेलच आणि यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढावे लागले तरी लढेन. केवळ नवे नियम-कायदे आणणे इतकाच सरकारचा हेतू नाही. फिल्ममेकर्सला त्यांची कथा त्यांच्या पद्धतीने मांडण्यापासून रोखणे,हाच सरकारचा हेतू आहे,’ असे पूजा भट म्हणाली.
पूजाच्या ‘बॉम्बे बेगम्स’ या सीरिजबद्दल सांगायचे तर, या सीरिजमध्ये पाच वेगवेगळ्या महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. सुहाना गोस्वामी, अमृता सुभाष, प्लाबिता बोर-ठाकूर. आध्या आनंद आणि पूजा भटने या महिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. अलंकृता श्रीवास्तव हिने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. उद्या 8 मार्चला ही सीरिज प्रदर्शित होतेय.