'पॅडमॅन' चित्रपटाची वर्षपूर्ती, अक्षयने शेअर केली ही पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 09:00 PM2019-02-09T21:00:00+5:302019-02-09T21:00:00+5:30
वर्षभरापूर्वी आलेल्या अक्षय कुमार आणि सोनम कपूरच्या 'पॅडमॅन' चित्रपटाने मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेशही दिला.
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक चित्रपट आले. पण वर्षभरापूर्वी आलेल्या अक्षय कुमार आणि सोनम कपूरच्या 'पॅडमॅन' चित्रपटाने मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेशही दिला. मासिक पाळी आणि त्या दरम्यान स्वच्छतेसाठी पॅडची अत्यावश्यकता आजही खेड्यापाड्यातील महिलांना पटवून द्यावी लागते व हाच संदेश या सिनेमाने सर्वांपर्यंत सहज हलक्या-फुलक्या पद्धतीने पटवून दिला.
'पॅडमॅन' चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने या चित्रपटातील फोटो शेअर करीत लिहिले की, 'या सिनेमाने मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यास भाग पाडले. मला अशाप्रकारचा सिनेमा करायला आवडेल जर तो मासिक पाळी आणि स्वच्छता या संवेदनशील विषयाला लोकांपर्यंत पोहचवण्यास हातभार लावणार असेल.'
'पॅडमॅन' चित्रपट तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ता अरुणाचलम मुरुगनंतम यांच्या जीवनावर आधारित असून मुरुगनांथम यांनी खेड्यापाड्यात माफक दरात महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करण्याचं काम केलं. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2016 साली पद्ममश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने पॅडमॅन या सिनेमाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.